अलिबाग : अलिबाग शहरातील सेंट मेरी कॉन्व्हेन्ट शाळेच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती, जंक फूड, मतदान आणि हुंडाबळी या आजच्या काळातील गंभीर विषयावर पथनाट्य करून नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे. शहरातील एस टी स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, रिलायन्स बाजार, पी एन पी नगर याठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यानी पथनाट्य सादर करून नागरिकांना व्यसनापासून दूर रहा, हुंडा देऊ नाका, मतदान हक्क बजावा आणि जंक फूडच्या आहारी जाऊ नका असा संदेश दिला आहे.
आज तरुण पिढी व्यसनाधीन होताना दिसत आहे. व्यसनाच्या आहारी गेल्याने स्वतच्या शरीराची हानी तर होतेच त्याचबरोबर कौटुंबिक स्वस्थाही बिघडले जात आहे. त्यामुळे व्यसनापासून दूर रहा आणि आनंदी आयुष्य जगा असा संदेश सेंट मेरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यतून दिला आहे. मतदान हा आपला हक्क आहे तो बजावला पाहिजे. मतदान केल्याने लोकशाही जिवंत राहत आहे. मतदान प्रक्रिया कशी चालते आणि त्यामुळे काय फायदा होतो याचे उत्तम सादरीकरण ही पथनाट्यातून करण्यात आले.
हुंडा देणे हे कायद्याने गुन्हा आहे. मात्र आजही काही समाजात मुलीच्या कुटुंबाकडून हुंडा घेतला जात आहे. हुंडा न दिल्याने निष्पाप मुलीचा बळी जात आहे. हुंडा देऊ नका असा संदेश पथनाट्यातून विद्यार्थ्यानी समाजाला दिला आहे. हल्ली जंक फूड खाण्याचे परिणाम वाढू लागले आहे. जंक फूड खाल्याने आपल्या शरीराला घातक आहे. त्यामुळे अती जंक फूड खाणे आरोग्यास अपायकारक आहे असा संदेश सेंट मेरीच्या विद्यार्थ्यानी पथनाट्यातून दिला आहे.
सेंट मेरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी चारही घेतलेले विषय हे समजाशी निगडित होते. त्यातून जनजागृती करून विद्यार्थ्यानी चांगला संदेश नागरिकांना दिला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर बरेल याच्या संकल्पनेतून ही पथनाट्य सादर केली. यावेळी शाळेच्या शिक्षिका, विद्यार्थी तसेच नागरिकांनी सहभाग देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.