खोपोली : खोपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत ढेकू गावात असलेल्या ‘इंडिया इलेक्ट्रिक पोल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’ नावाचा बोर्ड लावून आतमध्ये मात्र अंचल केमिकल लि. या नावाने रसायन बनवण्याचा व्यवसाय करणाऱ्या कारखान्यामध्ये प्रतिबंधित केलेले १०७ कोटी ३० लाख रुपयांचे एम. डी. (मेफेड्रॉन) रायगड व खोपोली पोलिसांच्या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आले आहेत.
या कारवाईमध्ये कारखान्याचे व्यवस्थापक, सुपरवायझर आणि एका तज्ज्ञ कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. यातील एकावर यापूर्वीही एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल झालेला असल्याची माहिती रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या तीन महिन्यांपासून रायगड जिल्ह्यामध्ये रासायनिक पट्टा असलेल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये कारखान्यांची नियमित तपासणी सुरू होती. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी पोलिस हवालदार लिंबाजी शेडगे आणि प्रशांत पाटील हे दोघे अंचल रासायनिक कारखान्यामध्ये गेले होते.
कारखान्यावर पाेलिसांचा छापा खालापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम आणि खोपोलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांच्या पथकाने छापा टाकला. ८५ किलो २०० ग्रॅम एमडी पावडर, एमडी पावडर बनवण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने आणि रासायनिक प्रक्रियेसाठी असेंबल केलेली साधनसामग्री आदी मुद्देमाल जप्त करून सील केला.
व्यवस्थापकांकडे रासायनिक पदार्थ निर्मितीचा वैध परवाना आढळला नाही. तेथे कच्चा माल तसेच त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी साधनसामग्री असेंबल केल्याचे दिसून आले. पावडरची नार्को इन्स्पेक्शन किटद्वारे तपासणी केली असता हा माल एम. डी. असल्याचे निष्पन्न झाले.