खोपोली : खालापूर तालुक्यातील ढेकू गावात बंद कारखान्यात शनिवारी १०७ कोटींचा अमली पदार्थांचा साठा (माफेड्रोन ड्रग्ज) जप्त करून तीन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान रविवारी होनाड गावातील एका गोदामातून १७४.५ किलो वजनाचे २१८ कोटी १२ लाख ५० हजारांचे अमली पदार्थ जप्त केले. आतापर्यंतच्या कारवाईत एकूण ३२५.४२ कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त केल्याची माहिती कोकण परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी दिली.
मौजे ढेकू गावात अंचल केमिकल कंपनी आहे. ही कंपनी बंद असून येथे अमली पदार्थ साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून शुक्रवारी पोलिसांनी कारवाई करत ८५ किलो २०० ग्रॅम वजनाचे १०७ कोटी ३० लाख ३७ हजार ३७७ रुपयांचे अमली पदार्थ, त्यासाठी वापरलेला कच्चा माल जप्त केला आहे.
चरस: निवृत्त पोलिसासह नातेवाइकांवर कारवाई
अलिबाग : नवी मुंबई येथील अमली पदार्थ विरोधी पथकाने रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिस स्टेशन हद्दीत कारवाई करीत निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याच्या नातेवाइकासह अन्य साथीदार यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तीन किलोच्या आसपास चरस नामक अमली पदार्थ जप्त केला आहे. नवी मुंबई येथील अमली पदार्थ विरोधी पथकास रेवदंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चरसची खरेदी - विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे याबाबत खात्री करीत पोलिसांनी छापा मारत रेवदंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून काही इसमांना ताब्यात घेतले.