लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : कोविड १९ लसीकरण मोहिमेला लवकरच सुरुवात होत आहे. त्या अगोदर लसीकरणाची रंगीत तालीम म्हणून ड्राय रन घेतला जात आहे. शुक्रवारी रायगड जिल्ह्यातील अलिबाग जिल्हा रुग्णालय, पेण उपजिल्हा रुग्णालय, श्रीवर्धन प्राथमिक आरोग्य केंद्र, पोयनाड आरोग्य केंद्र या चार ठिकाणी ड्राय रन सुरू आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन या ड्राय रनची पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड १९ लसीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. लसीकरण मोहिमेत आरोग्य यंत्रणेला कशा पद्धतीने लस द्यायची आहे, याची माहिती व्हावी, यासाठी ही रंगीत तालीम आहे. जिल्ह्यात अलिबाग, श्रीवर्धन, पेण या ठिकाणी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशाने कोविड १९ लसीकरण मोहिमेची रंगीत तालीम शुक्रवारपासून सुरू झाली आहे. यासाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी झाली असून, आरोग्य यंत्रणाही तयारीत आहे. जिल्ह्यात ५ लाख लस दाखल झाल्यानंतर त्वरित लसीकरण मोहीम सुरू केली जाणार आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.
जिल्ह्यात भविष्यात ५२ ठिकाणी केंद्रे उभारणारजिल्ह्यात आरोग्य यंत्रणेतील साडेआठ हजार लाभार्थ्यांची यादी आरोग्य यंत्रणेने तयार केली आहे. दररोज १०० लाभार्थ्यांना कोविडची लस दिली जाईल. यासाठी ड्राय रन होत आहे. प्रत्येक केंद्रावर २५ लाभार्थी लस घेणार आहेत. जिल्ह्यात भविष्यात ५२ ठिकाणी केंद्र उभारून लसीकरण केले जाणार आहे. लाभार्थ्यांची याची कोव-इन या अॅपवर नोंदणी केली .
पाच लाख लसी मिळणार - पालकमंत्रीरायगड : राज्यात कोविड १९ लसीकरण मोहीम लवकरच सुरू होणार आहे. त्याअगोदर लसीकरणाचा ड्राय रन म्हणजेच रंगीत तालीम सर्व सरकारी रुग्णालयांमधून घेतली जात आहे. जिल्ह्यासाठी पाच लाख कोरोना लस येणार आहेत. त्यानंतर लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे, असे रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. सरकारच्या आदेशानुसार कोविड-१९ लसीकरण मोहिमेच्या ड्राय रनला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यात फ्रंटलाइन वर्करसाठी पहिल्या टप्प्यात कोविड १९ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला तसेच आरोग्य यंत्रणेलाही लसीकरण मोहिमेची परिपूर्ण तयारी करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. रायगड जिल्ह्यासाठी ५ लाख लस दाखल होणार आहेत. त्या प्राप्त झाल्याबरोबर जिल्ह्यात त्वरित लसीकरण मोहीम सुरू केली जाणार आहे, असे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या वेळी सांगितले.