गणेशोत्सव जवळ आल्याने पेणमध्ये मूर्तिकारांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:19 AM2019-07-21T00:19:08+5:302019-07-21T00:19:21+5:30

देश-विदेशातून गणेशमूर्तींना मागणी : एक हजारपेक्षा अधिक कार्यशाळा : १५ हजारांपेक्षा जास्त कारागीर

Due to the arrival of Ganeshotsav, the sculptor's time in the pen | गणेशोत्सव जवळ आल्याने पेणमध्ये मूर्तिकारांची लगबग

गणेशोत्सव जवळ आल्याने पेणमध्ये मूर्तिकारांची लगबग

Next

दत्ता म्हात्रे 

पेण : गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सुंदर, सुबक, देखण्या गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या पेणमध्ये मूर्ती कार्यशाळांमध्ये सध्या कारागिरांची लगबग सुरू आहे. मूर्तिकार, कुशल-अकुशल कारागीर सध्या रात्रंदिवस कामात व्यस्त असल्याचे चित्र पेणमधील सर्वच मूर्ती कार्यशाळांमध्ये पाहावयास मिळत आहे.

पेणच्या गणेशमूर्ती महाराष्ट्रासह जगभरात प्रसिद्ध आहेत. राज्यातील विविध भागांतून तसेच देश-विदेशातून येथील गणेशमूर्तींना मोठी मागणी असून, दरवर्षी त्यात सातत्याने वाढ होत आहे. मूर्तिकलेचा परंपरागत वारसा लाभलेले पेणचे मूर्तिकार अनेक समस्या, अडचणींवर मात करून दरवर्षी लाखो गणेशमूर्ती तयार करून ही वाढती मागणी पूर्ण करण्यात यशस्वी ठरत आहेत.

सुंदर, सुबक देखणी मूर्ती, उत्कृष्ट रंगसंगती, प्रसन्न भावमुद्रा आणि जिवंतपणा दर्शविणारी डोळ्यातील सजीव-प्रसन्न आखणी हे पेणच्या गणेशमूर्तींचे वैशिष्ट असून, येथील दगडूशेठ हलवाई, खंडोबा, टिटवाळा, म्हैसुरी गणेश, बाल गणेश, फेटेवाला अशा एक ना अनेक लहान-गणेशमूर्तींना सर्वाधिक पसंती लाभली आहे. स्वातंत्रपूर्ण काळापासून या मूर्तिकलेचा वारसा पेणला लाभलेला असून राजाभाऊ देवधर, वामनराव देवधर व बंडू पेंटर, पुंडलिक पेंटर, शंकर पेंटर, रामलाल पेंटर, फाटक, बांदिवडेकर, सोप्टे, चाचड, समेळ अशा अनेक नामवंत मूर्तिकारांनी या कलेचे व पेणचे नाव उज्ज्वल करण्यात मोठे योगदान दिले आहे. व त्यांच्या या कलेचा पिढीजात वारसा पुढील पिढ्यांनी समर्थपणे पुढे नेऊन पेण नगरीच्या नावलौकिकात भर टाकली आहे. अनेक मूर्तिकारांच्या चौथ्या, पाचव्या पिढ्या व्यवसायात कार्यरत आहेत.

मोठी व्याप्ती असलेल्या या व्यवसायात दरवर्षी करोडोंची मोठी उलाढाल होते. पेणचे गणपती विदेशातही जात असून अमेरिका, कॅनडा, युरोप, ऑस्ट्रेलिया, फिजी, मलेशिया, सिंगापूर, अरब राष्टÑ आदी देशांतील अनिवासी भारतीयांकडून येथील गणपतींना मागणी असते. दहा हजारांहून अधिक गणेशमूर्ती विदेशात मागणीनुसार येथून निर्यात होतात.

शहरात कुंभारआळी, कासारआळी, नंदीमाळनाका, परीटआळी, झिराळआळी, चावडीनाका, कोंबडपाडा, शंकरनगर, फणसडोंगरी, गुरवआळी, दातारआळी, हनुमानआळी, कौंडाळतळे, नवीन वसाहत आदी विविध भागांत गणेशमूर्तींचे कारखाने आहेत, तर ग्रामीण भागात हमरापूर, जोहे, कळवे, दादर, शिर्की, कणे, वडखळ, वाशी, वढाव, भाल, खारपाडा, गडब, कासू आदी अनेक गावांतही गणपतींच्या कारखान्यांची संख्या मोठी असून दरवर्षी लाखो मूर्ती तयार होतात.

हमरापूर, जोहे, कळवे आदी गावांतून कच्च्या मूर्तीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. दहा फुटांपर्यंतच्या मोठ्या मूर्तीदेखील येथे बनतात. सुरुवातीच्या काळात गणेशमूर्ती शाडूच्या मातीच्या बनविल्या जात असत. मात्र, नंतर प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती तयार होऊ लागल्या. पेण तालुक्यात हजाराहून अधिक गणेशमूर्तींचे कारखाने असून, त्यात १५ हजारांहून अधिक मूर्तिकार, कारागीर कार्यरत आहेत. गेल्या २५ ते ३० वर्षांत हा व्यवसाय झपाट्याने वाढून पेण ही गणेशमूर्ती व्यवसायाची मोठी बाजारपेठ म्हणून विकसित होऊन नावारूपाला आली आहे. नाबार्ड, विविध बँका, अनेक संस्था व काही शासकीय योजना या माध्यमातून या व्यवसायांसाठी अर्थसाहाय्य उपलब्ध होत असल्याने हा व्यवसाय झपाट्याने वाढीस लागून दरवर्षी २५ लाखांहून अधिक गणेशमूर्ती येथे तयार होऊ लागल्या आहेत. यंदाही लाखो गणेशमूर्ती येथील कारखान्यातून तयार करण्यात आल्या आहेत.

Web Title: Due to the arrival of Ganeshotsav, the sculptor's time in the pen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :ganpatiगणपती