- जयंत धुळपअलिबाग : महापारेषण कंपनीची आपटा येथून येणारी १०० किलोवॅट क्षमतेची उच्चदाब विद्युत वाहिनी पेण तालुक्यातील खरोशी येथे सोमवारी दुपारी २.२० वाजता तुटली. त्यामुळे महापारेषण कंपनीची थळ (अलिबाग) व जिते (पेण) येथील वीज वितरण उपकेंद्रे बंद पडली. परिणामी वडखळ आणि पांडापूर परिसर वगळता संपूर्ण अलिबाग व पेण तालुक्याचा वीजपुरवठा बंद झाला होता. संध्याकाळी ५.४० वाजता दुसऱ्या वीजवाहिनीवरून वीजपुरवठा सुरू करण्यात वीज वितरण कंपनीला यश आले असले तरी हा वीजपुरवठा कोणत्याही क्षणी खंडित होवू शकतो. विद्युत पुरवठा तात्पुरता स्वरूपात दुसºया वाहिनीवरून चालू केला आहे. संध्याकाळी भार वाढल्यास वीजपुरवठा खंडित करून, भारनियमन करावे लागेल. परिणामी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वीज वितरण कंपनीने अलिबाग व पेण तालुक्यांतील ग्राहकांना केले आहे.महापारेषण कंपनीच्या उच्च दाब वीजवाहिनीद्वारे वीज वितरण कंपनीस वीजपुरवठा करण्यात येतो. महापारेषण कंपनीच्या आपटा येथील केंद्रातून १०० किलोवॅट क्षमतेच्या दोन उच्च वीज दाब वाहिन्यांद्वारे थळ(अलिबाग) व जिते(पेण) या वीज वितरण कंपनीच्या उप केंद्रांना वीजपुरवठा करण्यात येतो. त्यापैकी क्रमांक-०२ च्या उच्च दाब वाहिनीचा कंडक्टर दुपारी २ वाजता तुटला आणि या वाहिनीवरील वीजपुरवठा देखील क्रमांक-२च्या उच्च दाब वाहिनीवर आला आणि तीही वाहिनी दुपारी २.२० वाजता खंडित झाल्याने दोन्ही तालुक्यांतील वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे पेण येथील कार्यकारी अभियंता आर.बी.माने यांनी दिली.महापारेषण कंपनीच्या अभियंत्यांनी दोन्ही उच्च दाब वाहिन्यांची तत्काळ तपासणी सुरू केली असता क्रमांक-२ वाहिनीचा कंडक्टर तुटल्याचे लक्षात आले. क्रमांक-१ ची उच्च दाब वाहिनीच्या टॉवर क्र.३० व ३१ यांची तपासणी पूर्ण करून संध्याकाळी उच्चदाब वाहिनीतून अलिबाग व पेण तालुक्यांना वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात आला आहे. मात्र संध्याकाळी वा रात्री विजेची मागणी वाढल्यावर या क्रमांक-०१ या एकाच उच्च दाब वाहिनीवर अतिरिक्त दाब (लोड) येण्याची शक्यता विचारात घेवून, अतिरिक्त दाब नियंत्रणाकरिता लोडशेडिंग करणे अनिवार्य राहाणार आहे. परिणामी अलिबाग व पेण तालुक्यांतील काही भागांतील वीजपुरवठा खंडित होवू शकतो, अशीही माहिती माने यांनी पुढे दिली आहे.कॅप्टीव पॉवरचा उपयोग नाहीआरसीएफ, जेएसडब्ल्यू आदी मोठ्या कंपन्यांमधील त्यांच्या टर्बोजनरेटरमधून कॅप्टीव पॉवर जनरेट (अंतर्गत वीजनिर्मिती) होते, परंतु ती या कंपन्या स्वत: करिता अधिक प्रमाणात वापरतात, ती वीज वितरण कंपनीस उपलब्ध होत नसल्याने त्या अंतर्गत निर्मित विजेचा वीज वितरण कंपनीस उपयोग होत नसल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. दरम्यान, गेल्या १० वर्षातील हा मोठा पॉवर ब्रेकडाउन असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.- अलिबाग आणि पेण तालुक्यांत महावितरणचे औद्योगिक वीज वापराचे ६००, व्यावसायिक वीज वापराचे १० हजार तर घरगुती वीज वापराचे एक लाख वीज ग्राहक असल्याची माहिती अलिबाग वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता माणिकराव तपासे यांनी दिली आहे. दुपारी २.२० ते संध्याकाळी ५.४० अशा सुमारे तीन तासाकरिता या सर्व वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता, आणि येथून पुढे देखील वीजपुरवठा खंडित होण्याची टांगती तलवार या सर्व ग्राहकांच्या डोक्यावर कायम राहाणार आहे. तीन तास वीजपुरवठा खंडित झाल्याने औद्योगिक वीज वापर करणाºया ६०० आणि व्यावसायिक वीज वापर करणाºया १० हजार अशा एकूण १० हजार ६०० वीज ग्राहकांना मोठा फटका सहन करावा लागला आहे
खंडित वीजपुरवठ्यामुळे १० हजार ग्राहकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 3:57 AM