बदलत्या हवामानामुळे हापूस आंबा उत्पादनात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 03:01 AM2018-05-20T03:01:07+5:302018-05-20T03:01:07+5:30
गतवर्षी आंबा उत्पादन ६५ टक्के होते ते यंदा हे प्रमाण ३५ टक्क्यांवर आल्याची माहिती अलिबाग तालुक्यात भूबनेश्वर येथील आंबा बागायतदार डॉ. जगन्नाथ पाटील यांनी दिली आहे.
अलिबाग : अवकाळी पाऊस आणि बदलते हवामान यांचा विपरित परिणाम सातत्याने हापूस व अन्य आंबा पिकावर होत आहे. त्यामुळे आंबा उत्पादनात घट होत आहे.
गतवर्षी आंबा उत्पादन ६५ टक्के होते ते यंदा हे प्रमाण ३५ टक्क्यांवर आल्याची माहिती अलिबाग तालुक्यात भूबनेश्वर येथील आंबा बागायतदार डॉ. जगन्नाथ पाटील यांनी दिली आहे.
अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागात संरक्षक बंधारे फुटल्याने समुद्राचे खारेपाणी शेतीत घुसून भातशेती नापिकी झाली आहे. शेतकऱ्याच्या चरितार्थासाठी याच खारेपाटातील डोंगरउतारावर आंबा लागवड केल्यास आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेता येऊ शकते आणि त्यांतून शेतकºयांना चांगली आर्थिक प्राप्ती होऊ शकते, हे राज्य शासन कृषी पुरस्कारप्राप्त मारुती नागू पाटील उर्फ मारुती मास्तर यांनी सिद्ध करून दाखविले आहे. अनेक शेतकºयांना आंबा बाग करण्याकरिता त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या जागेवर जाऊन मार्गदर्शनही केले आहे.
भातशेती नापीक झाल्याने हवालदिल झालेल्या शेतकºयांस आंबा बागायतीतून नवा आत्मविश्वास गवसला; परंतु गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पाऊस आणि बदलते हवामान यांचा विपरित परिणाम या आंबा बागायतदारांना सोसावा लागत असल्याने पुन्हा एकदा हा शेतकरी हवालदिल झाला आहे. औषधे आणि फवारणीचा खर्चदेखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर खारेपाटातील आंबा बागायतदारांकरिता शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून नवे नियोजन आणि सहकार्याचा हात मिळणे आवश्यक असल्याचे मारुती मास्तर यांनी सांगितले.
खारेपाटात उधाणाच्या पाण्यामुळे अनेकांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. उदरनिर्वाहासाठी पर्याय म्हणून अनेकांनी कडधान्य, फळलागवडीला प्राधान्य दिले. मात्र, अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे आता फळलागवड करणारे बागायतदार हवालदिल झाले असून नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत.
अवकाळी पावसाचा फटका गतवर्षी ६५ टक्के तर यंदा ३५ टक्के उत्पादन
आंबा निर्यात सुविधेची गरज
गेली अनेक वर्षे अलिबाग तालुक्यातील हापूस आंबा सर्वप्रथम मुंबईच्या बाजारपेठेत पोहोचत आहे.
ही परंपरा आबाधित राखून हापूस आंब्यातून परकीय चलन देशाला प्राप्त करून घेण्याकरिता आंबा निर्यातीची सुविधा येथे मिळणे गरजेचे असल्याचे डॉ. जगन्नाथ पाटील यांनी सांगितले.बाजारपेठेत जाण्याकरिता मारुती मास्तर यांच्या बागेत सज्ज झालेला हापूस आंबा