एसटी बंद झाल्याने ग्रामस्थांचे हाल
By admin | Published: July 24, 2016 03:47 AM2016-07-24T03:47:40+5:302016-07-24T03:47:40+5:30
म्हसळा तालुक्यातील सांगवड, ठाकरोली व कोकबल ही गावे दुर्गम व डोंगराळ भागात आहेत. रस्ते, आरोग्य, पाणी अशा पायाभूत सुविधांपासून गेली कित्येक वर्षे ही गावं वंचित आहेत.
म्हसळा : म्हसळा तालुक्यातील सांगवड, ठाकरोली व कोकबल ही गावे दुर्गम व डोंगराळ भागात आहेत. रस्ते, आरोग्य, पाणी अशा पायाभूत सुविधांपासून गेली कित्येक वर्षे ही गावं वंचित आहेत.
म्हसळा - सांगवड या जिल्हा परिषदेच्या ताब्यातील मार्गाची दुरवस्था झाल्याने दरवर्षी पावसामध्ये वाहतुकीचे एकमेव साधन असलेली येथील एसटीसेवा बंद करण्यात येते. सांगवडपासून उच्च माध्यमिक शाळा १३ कि.मी., माध्यमिक शाळा सुमारे १० कि.मी. दूर, तर प्राथमिक शाळा ३ कि.मी. एवढ्या अंतरावर आहे. सांगवड, ठाकरोलीच्या ग्रामस्थांना बाजारहाट व इतर दैनंदिन व्यवहारासाठी म्हसळेशिवाय अन्य दुसरा पर्याय नाही.
पावसाळ्यात एसटी बंद झाल्यामुळे गावातील विद्यार्थी व वृद्धांना १०-१२ कि.मी. चालत जावे लागते. गेल्या अनेक वर्षांपासून हीच परिस्थिती असल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. एखादा व्यक्ती आजारी पडली तर त्याला डॉक्टरकडे कसे न्यायचे, हा प्रश्न आहे. उपचाराअभावी रुग्ण दगावण्याची शक्यता असल्याने या मार्गाची डागडुजी करून एसटीसेवा सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.