थंडीमुळे महाड तालुका गारठला, धुक्यामुळे वाहतूक धिम्या गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 02:49 AM2017-12-14T02:49:33+5:302017-12-14T02:49:50+5:30
गेल्या आठवड्यात ‘ओखी’ चक्रिवादळाच्या भीतीने संपूर्ण कोकण किनारपट्टी परिसर हादरून गेला होता. यानंतर काही काळ धूरक्यामुळे हिवाळा असूनही थंडी जाणवत नव्हती.
दासगाव : गेल्या आठवड्यात ‘ओखी’ चक्रिवादळाच्या भीतीने संपूर्ण कोकण किनारपट्टी परिसर हादरून गेला होता. यानंतर काही काळ धूरक्यामुळे हिवाळा असूनही थंडी जाणवत नव्हती. मात्र, सध्या गेल्या चार दिवसांपासून महाड तालुका गारठला आहे. धुक्यामुळे महामार्गाची वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.
थंडीचे दिवस असूनदेखील गेल्या आठवड्यापर्यंत थंडी गायब होती. मात्र, गेल्या चार दिवसांपासून थंडीचा तडाखा वाढला आहे. महाड तालुका गारठून गेला आहे. रात्री ८ ते सकाळी ९ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात पडणारी थंडी, तसेच मोठ्या प्रमाणात पडणारे धुके याचा मात्र नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दोन-तीन दिवसांपासून परिसरात धुक्याची चादर असल्याने महामार्ग तसेच तालुक्यातील अंतर्गत गावातील जाणाºया वाहनांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दाट धुक्यामुळे महामार्गावरून जाणाºया वाहनचालकांना काहीच दिसत नसल्याने वाहने धिम्या गतीने चालवावी लागत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. मात्र, कडाक्याच्या थंडी व धुक्यामुळे (दव) तालुक्यातील कडधान्याच्या शेतीला मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे शेतकºयांकडून बोलले जात आहे. उशिरापर्यंत पडलेला पाऊस व थंडी यामुळे कडधान्याचे पीक चांगले मिळण्याच्या आशेने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.