तलाठी संघटनेच्या संपामुळे २७० गावांचे महसुली कामबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 12:46 AM2019-11-16T00:46:22+5:302019-11-16T05:30:12+5:30
महाड शहर पोलीस ठाण्यात जमीन फसवणूक प्रकरणाबाबत एक गुन्हा दाखल असून, यामध्ये तलाठी सुग्राम जामसिंग सोनावणे यांना अटक केली,
सिकंदर अनवारे
दासगाव : महाड शहर पोलीस ठाण्यात जमीन फसवणूक प्रकरणाबाबत एक गुन्हा दाखल असून, यामध्ये तलाठी सुग्राम जामसिंग सोनावणे यांना अटक केली, तर महसूल कर्मचारी राजेंद्र उभारे यांचे नावही समाविष्ट केल्या प्रकरणी महाड, पोलादपूर तलाठी संघाच्या वतीने सोमवारी दुपारी काळ्या फिती लावून काम केले होते. याबाबत रायगड, महाड, आणि पोलादपूर तलाठी संघाने महाड उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांना एक निवेदनही दिले. महाड पोलादपूरमधील तलाठी संघाने महाड शहर पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करत आता तलाठी संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला तीन दिवस उलटून गेले असून, प्रशासनाने या आंदोलनाची कोणतीच दखल घेतली नाही, त्यामुळे महाड आणि पोलादपूर तालुक्यातील २७० गावांचे महसुली कामकाज बंद पडले आहे. अनेक दाखले, सातबारे, फेरफार नोंदी, रेशन कार्डची कामे, अशी कामे होत नसल्याने सामान्य नागरिकांचे हाल झाले आहेत.
महाड शहर पोलीस ठाण्यात तलाठी सुग्राम जामसिंग सोनावणे यांना अटक झाल्यानंतर आणि राजेंद्र उभारे यांचे केसमध्ये नाव आल्यानंतर महाड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी शैलेश सणस यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी करून यांचा विरोध दर्शवत ११ नोव्हेंबर रोजी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला आणि सणस यांची निलंबनाची मागणी केली. मात्र, त्यांना प्रशासनाकडून कोणतेच समाधानकारक उत्तर न मिळाल्याने महाड आणि पोलादपूर तालुक्यांतील ५० तलाठी आणि ९ मंडळ अधिकारी यांनी १३ तारखेपासून काम बंद आंदोलन सुरू केले आणि गेले तीन दिवस महाड तहसील कार्यालयासमोर सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी ठिय्या मांडून बसले आहेत. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ पसरला आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. ज्या शेतकºयांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे व्हावे आणि त्यांना लवकर नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी स्थती निर्माण असताना महाड आणि पोलादपूर तालुक्याचे सर्व महसूल कामकाज बंद पडले आहे. यामुळे शेतकरी वर्गात एक अस्वस्थता निर्माण झाली आहे.
>महाड, पोलादपूरमध्ये ५० तलाठी सजा तर ९ मंडळ अधिकारी
दोन तालुक्यांत ५० तलाठी सजा कार्यान्वयित आहेत, तर ९ मंडळ अधिकारी काम करत आहेत. यामध्ये महाड तालुक्यातील १८३ गावे आणि पोलादपूरमधील ८७ गावे, अशा दोन्ही तालुक्यांतील २७० गावांचा समावेश आहे. गेले तीन दिवस महसूल कर्मचाºयांच्या या संपामुळे उत्पादन दाखले, जाती दाखले, नॉन क्रिमिनल दाखले, रेशन कार्ड, अल्पभूधारक, भूधारक या संदर्भातील सर्व दाखले तसेच सातबारा नोंदी, आठ अ आणि फेरफार नोंदी, ही कागदपत्रे गेले तीन दिवस तलाठी कार्यालये बंद असल्याने मिळत नसल्याने सामान्य नागरिकांचे फार मोठे हाल झाले आहेत.तलाठी आणि मंडळ अधिकारी या काम बंद आंदोलनापूर्वी जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत, त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि निवडणूक कामे वगळून कामे केली जाणार नाहीत, असे निवेदन देण्यात आले. मात्र, आजही काही शेतकºयांचे पंचनामे शिल्लक आहेत.
>जिल्ह्यात पडसाद उमटणार?
गेल्या तीन दिवसांच्या आंदोलनामुळे प्रशासनाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने सामान्य नागरिकांचे फार मोठे हाल होत आहेत. या आंदोलनाचा निर्णय जर लागला नाही, तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाड तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष संदेश पानसारी यांनी दिली. त्याचबरोबर तीन दिवस उलटून गेले तरी प्रशासनाकडून कोणतीच दखल न घेतल्याने पानसारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.