नवी मुंबई मेट्रोच्या कामाला ठेकेदार नसल्याने ५ स्थानकांचे काम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 04:33 AM2018-08-30T04:33:18+5:302018-08-30T04:33:57+5:30
प्रकल्पाची रखडपट्टी : निविदा काढण्यात सिडकोकडून दिरंगाई
कमलाकर कांबळे
नवी मुंबई : सिडकोचा महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्प ठेकेदाराच्या नियुक्तीअभावी रखडला आहे. या मार्गावरील ११पैकी पाच स्थानकांचे काम मागील दोन अडीच वर्षांपासून ठप्प आहे, तर उर्वरित सहा स्थानकांचे काम कुर्मगतीने सुरू आहे. त्यामुळे मेट्रोची डेडलाइनसुद्धा हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सिडकोने २0११मध्ये नवी मुंबई मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. तीन टप्प्यांत हा मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. त्यासाठी चार हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यापैकी बेलापूर-खारघर-तळोजा-पेंधर या ११ कि.मी. लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम मागील पाच वर्षांपासून सुरू आहे. मात्र, विविध कारणांमुळे या कामाची गती मंदावली आहे. दरम्यानच्या काळात आर्थिक दिवाळखोरीमुळे मेट्रोच्या एका कंत्राटदाराने या प्रकल्पातून अंग काढून घेतले. तेव्हापासून या प्रकल्पाची रखडपट्टी सुरू आहे.
सध्या ११पैकी सहा स्थानकांचे काम संथगतीने सुरू आहे, तर उर्वरित पाच स्थानकांचे काम ठेकेदाराअभावी ठप्प पडले आहे. त्याचा फटका सिग्नल, टेलिकम्युनिकेशन, रोलिंग आणि आॅटो फेअर या कामांना बसला आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यासाठी डिसेंबर २0१८ चा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. मात्र, कामच ठप्प पडल्याने आता मे २0१९ ची डेडलाइन जाहीर करण्यात आली आहे; परंतु रखडलेल्या कामासाठी ठेकेदार निवडीची प्रक्रिया अद्याप सुरूच झाली नसल्याने ही डेडलाइन सुद्धा हुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पहिल्या टप्प्यातील ११ कि.मी. लांबीच्या या मार्गासाठी सुरुवातीच्या काळात दोन हजार कोटी रुपये खर्च अंदाजित करण्यात आला होता. दुसरा टप्पा ८.३५ कि.मी. लांबीचा आहे. तळोजा एमआयडीसी-कळंबोली-खांदेश्वर मार्गे आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा मार्ग जोडला जाणार आहे. त्यासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. पहिल्या दोन टप्प्यांना जोडण्यासाठी तिसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. हा टप्पा केवळ २ कि.मी. लांबीचा असून, त्यासाठी ५७४ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे; परंतु पहिलाच टप्पा पाच वर्षे रखडल्याने उर्वरित तीन टप्प्यांचे कामही लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या एकूण खर्चात दुपटीने वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मेट्रोच्या कामासाठी नवीन कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत मे २0१९ पर्यंत मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
- दीपक हरताळकर,
अधीक्षक अभियंता (मेट्रो),
सिडको
मेट्रो कोच धूळखात पडून
बेलापूर ते पेंधर या पहिल्या टप्प्यातील ११ किमी लांबीच्या मार्गावर चिनी बनावटीच्या मेट्रो धावणार आहे. यासंदर्भात चिनी कंपनीबरोबर सिडकोने करार केला असून ३२0 कोटी रुपये किमतीच्या आठ मेट्रोची आयात केली जाणार आहे. त्यापैकी दोन मेट्रो कोच सिडकोच्या ताफ्यात यापूर्वीच दाखल झाल्या आहेत. सुमारे ८0 कोटी रुपये किमतीच्या या मेट्रो कोच मागील वर्षभरापासून धूळखात पडून आहेत.