कोरोनामुळे पालीतील रंग, पिचकारी व्यावसायिकांचा झाला बेरंग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 01:28 AM2021-03-28T01:28:58+5:302021-03-28T01:29:06+5:30

किंमत कमी पण विक्री कमालीची घटली

Due to the corona, the color of the pali, the injectors became colorless | कोरोनामुळे पालीतील रंग, पिचकारी व्यावसायिकांचा झाला बेरंग 

कोरोनामुळे पालीतील रंग, पिचकारी व्यावसायिकांचा झाला बेरंग 

Next

पाली :  हंगामी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे पुन्हा एकदा कंबरडे मोडले आहे. यावर्षीही होळी व धुलिवंदन सणांवर कोरोनाचे सावट असल्यामुळे व्यावसायिकांचा पुन्हा बेरंग झाला आहे. विशेष म्हणजे यंदा घाऊक बाजारात रंग व पिचकाऱ्यांच्या किमती १० ते २० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत, तरीदेखील कोरोनामुळे किरकोळ विक्रेत्यांनी त्या विक्रीसाठी आणलेल्या नाहीत तसेच विक्रीतही कमालीची घट झाली आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णवाढीचा दर दुप्पट आहे.  जिल्ह्यात सध्या ३१ हजारपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अनेकांनी रंग व पिचकाऱ्या खरेदीसाठी आपला हात आखडता घेतला आहे. कोरोनामुळे यंदा धुलिवंदन खेळणार नसल्याचे नागोठणे येथील पियुष सोनावणे या मुलाने सांगितले. कोरोनाच्या दहशतीमुळे चिनी मालाला भारतीय बाजारपेठेतून मागणी नव्हतीच. मात्र, भारतीय बनावटीचा मालदेखील कोरोनाच्या दहशतीने विकला जात नाही. त्यामुळे व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मागील वर्षीचाच माल यंदा विक्रीसाठी ठेवल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. 

गतवर्षी होळी आणि धुळवडसाठी जिल्ह्यातील बाजारपेठा सजल्या होत्या. विविध दुकानांमध्ये देशी रंग, वेगवेगळया प्रकारच्या पिचकाऱ्या असा लाखो रुपयांचा माल दुकानदारांनी भरला होता.  इकोफ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक व सुक्या रंगाना जास्त पसंती असल्याने तोही माल दुकानात मुबलक होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तेव्हा अनेकांनी रंग व पिचकाऱ्या खरेदीच केल्या नाहीत. यंदा तर कोरोनामुळे गतवर्षीच्या तुलनेत पिचकारी व रंगांची विक्री अवघ्या १० ते २० टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.

गतवर्षी होळी व धुळवडीसाठी दुकानात मुबलक माल भरून ठेवला होता. मात्र, कोरोनाच्या भीतीने रंग, पिचकाऱ्या व इतर सामग्री फारशी कोणी खरेदी केली नाही. त्यामुळे यंदा घाऊक बाजारात किमती उतरल्या असल्या तरी नवीन माल आणला नाही. खबरदारी म्हणून फक्त सुके रंग विक्रीसाठी ठेवणार आहे. - नीलेश गुप्ता, व्यावसायिक 

Web Title: Due to the corona, the color of the pali, the injectors became colorless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.