कोट्यवधी खर्चूनही घाट रस्त्याचे काम निकृष्टच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:25 AM2018-06-01T01:25:42+5:302018-06-01T01:25:42+5:30
थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमधील घाट रस्त्याचे काम स्थानिकांनी १९७४ मध्ये श्रमदानातून केले, त्यामुळे माथेरानमधील पर्यटनाला चालना मिळाली.
मुकुंद रांजणे
माथेरान : थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमधील घाट रस्त्याचे काम स्थानिकांनी १९७४ मध्ये श्रमदानातून केले, त्यामुळे माथेरानमधील पर्यटनाला चालना मिळाली. त्यानंतर आता रस्ता दुरु स्ती तसेच रुंदीकरणासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणांतर्गत काम करण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी तब्बल ३६ कोटी रु पये खर्च करण्यात येत आहेत.
घाटरस्त्यासाठी एवढा मोठा निधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र इतका निधी खर्च करूनही ठेकेदाराकडून करण्यात येणारे काम निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे वर्षभरात किंवा अतिवृष्टीत रस्त्याची दुरवस्था होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेले निकृष्ट काम थांबवावे, यासाठी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी संबंधित अधिकारी वर्गाकडे लेखी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे घाटमाथ्यावरील कामाला सध्या स्थगिती मिळाली आहे.
सध्या सुरू असलेल्या कामाचा दर्जा एकदमच निकृष्ट आहे. ज्या ठिकाणी रस्ता वाढविण्याची गरज आहे, तो अरुंदच ठेवण्यात आला आहे. संरक्षण भिंतीचे कामही कमकुवत असल्याने ती के व्हाही ढासळू शकते. अनेक ठिकाणी जुन्या लोखंडी रेलिंगच्या बाजूने काँक्र ीटीकरण केलेले आहे. त्यामुळे भविष्यात लोखंडी रेलिंग गंजल्यावर काँक्रीटीकरण निखळण्याची शक्यता आहे.
संरक्षण भिंती उभारताना पायासाठी खोदकाम केलेले नाही, तर काही ठिकाणी गरज नसतानाही बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता बांधणीत विलंब होत असून कामाचा दर्जाही चांगला नाही. नेरळ-माथेरान घाट रस्त्याचे काम एमएमआरडीएमार्फत एन एन एजन्सी या ठेकेदाराला देण्यात आले आहे. मात्र काम चांगल्या पध्दतीने होत नसल्याने स्थानिकांसह, नेरळ टॅक्सी युनियनमध्येही संतापाची लाट आहे. काम वेळेत करण्याच्या नादात ठेकेदाराने त्याचा दर्जा घसरवल्याची तक्रार माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, माजी नगराध्यक्ष अजय सावंत, विवेक चौधरी, शिवाजी शिंदे यांनी केली आहे. त्यांनी प्रत्यक्ष नेरळ-माथेरान घाटात पाहणी करून ठेकेदाराला चुकीची कामे निदर्शनास आणून दिली.
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त मदान आणि अतिरिक्त महानगर आयुक्त दराडे यांच्याकडेही तक्र ारी केल्यावर संबंधित ठेकेदाराला दर्जेदार कामाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र तरीही ठेकेदाराकडून दुर्लक्ष होताना दिसते. गटारांवर गरज नसताना क्र ॅश बॅरियर टाकण्याचे काम केले गेले. जुन्याच कठड्यांवर नवीन कठडे उभारण्यात आले आहेत. रस्त्याचे डांबरीकरण १५ मेनंतरही चालूच आहे. जुने चॅनलचे रेलिंग आहे, त्यालाच दोन्ही बाजूने प्लाय लावून काँक्र ीट भरण्यात आले आहे. कामात कोणतीही सुधारणा न झाल्याने खेडकर यांनी मुख्य अभियंत्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर रविवार, २७ मे रोजी एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता जयवंत डहाणे, अधीक्षक अभियंता एस.एस. वरसकर यांनी घाटाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर डांबरीकरणाचे काम थांबवण्यात आले असून उर्वरित कामेही पाऊस संपताच सुरू करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत.