कोट्यवधी खर्चूनही मांडवा बंदर ‘गाळात’, प्रकल्पावर खर्च केलेले २०० कोटी वाया जाण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 12:48 AM2019-07-06T00:48:47+5:302019-07-06T00:49:46+5:30
गाळ काढण्यासाठी एमएमबीने दोन वेळा कोट्यवधी रुपये खर्च केले, परंतु परिस्थिती जैसे थे असल्याने हे पैसे वाया गेले आहेत.
- आविष्कार देसाई
अलिबाग : मांडवा बंदर येथे रो-रोे सेवा सुुरू करण्यासाठी तसेच बंदरामध्ये बाराही महिने प्रवासी वाहतूक करता यावी यासाठी सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून संरक्षक भिंत (ब्रेक वॉटर वॉल) उभारली आहे. मात्र या चॅनेलमध्ये वारंवार गाळ साचत आहे.
गाळ काढण्यासाठी एमएमबीने दोन वेळा कोट्यवधी रुपये खर्च केले, परंतु परिस्थिती जैसे थे असल्याने हे पैसे वाया गेले आहेत. गाळ साचण्यामागील कारणे शोधण्यासाठी, याचा संपूर्ण अभ्यास (सील्टेशन अॅनालिसेस) करण्यासाठी मेरीटाइम बोर्डाने (एमएमबी) आता
सल्लागार कंपनीकडून निविदा मागविल्या आहेत.
मांडवा बंदरातून रोरो सेवेसाठी गाळ काढण्याच्या कामामध्ये फसवणूक झाल्याच्या तक्र ारी येथील आरटीआय कार्यकर्ते संजय सावंत यांनी सरकार दरबारी केल्या होत्या.
सावंत यांच्या तक्र ारीनुसार, मुंबई पोर्ट ट्रस्टने जलआरेखक (हायड्रोग्राफर) एमएमबी यांना पत्र लिहून कार्यवाहीबाबत निर्देश दिले होते. मुंबई पोर्ट ट्रस्टने चौकशी सुरू केल्यावर एमएमबीने या प्रकरणातील कंत्राटदार रॉक अँड रिफ ड्रेझिंग या कंपनीला नोटीस काढत खुलासा मागवला.
रोरो सेवेसाठी कथित गाळ काढण्याच्या कामावर याआधी सुमारे १६ कोटी रुपये, त्यानंतर साडेचार कोटी, संरक्षक भिंतीसाठी १३५ कोटी, मांडवा बंदर आणि त्यावरील इतर सुविधा, बहुचर्चित रोरो सेवा प्रकल्पांवर ३० कोटी व अन्य असा सुमारे २०० कोटी रुपये खर्च करणाऱ्या एमएमबीला नव्याने उपरती झाली आहे.
मांडवा येथे गाळ का साचतो? येथील गाळाचा पॅटर्न काय आहे? मांडवा येथील लाटांचे स्वरूप वर्षभर कसे असते? समुद्राची पातळी कमी जास्त होते का? याबाबतचा संपूर्ण अभ्यास (सील्टेशन अॅनालिसेस) करण्यासाठी एमएमबीने आता सल्लागार कंपनीकडून निविदा मागवल्या असून चार कंपन्यांनी निविदेमध्ये स्वारस्य दाखविले आहे. या कंपन्यांची एमएमबीसोबत निविदापूर्व बैठक १४ आणि १९ जून दरम्यान मुंबई येथे झाली.
बैठकीनुसार निविदेचा कालावधी १३ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. अभ्यासासाठी (सील्टेशन अॅनालिसेस) मेरीटाइम बोर्डाने ५३ लाख
रुपयांचा निधी निश्चित करण्यात आला आहे.
एमएमबीने मांडवा बंदरातील प्रकल्पासाठी सुमारे २०० कोटी रुपये खर्च केले आहेत. नियोजनशून्य कारभारामुळे कोट्यवधी रुपये वाया जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
निर्माण होणारे प्रश्न
मांडवा येथील समुद्रामध्ये १३५ कोटी रुपये खर्च करून बांधलेली ब्रेकवॉटर वॉल चुकीच्या जागी बांधली गेली आहे का?
ब्रेकवॉटर वॉल बांधण्यापूर्वी ओसीयन ग्राफीक अॅण्ड सर्व्हे आॅफ इंडियाकडून अभ्यास अहवाल करण्यात आला होता किंवा कसे ?
विशेष म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्टने गाळ वाहून नेणाºया बार्जेसना ट्रॅकिंग सिस्टीम का बसवले नाहीत
गाळ काढणाºया बार्जेसची नोंद व्हेसल ट्रॅकिंग मॅनेजमेंट सिस्टीममध्ये करण्यात आलेली नसताना रॉक अँड रिफ ड्रेझिंग या कंपनीला गाळ काढण्यासाठी कोट्यवधी रुपये का देण्यात आले ?