चक्रिवादळामुळे जंगलातील महाकाय वृक्ष कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 04:35 AM2018-10-03T04:35:46+5:302018-10-03T04:36:07+5:30
कार्लेखिंड : चक्रिवादळामुळे दोन दिवसांपूर्वी पश्चिम किनारपट्टीच्या अलिबाग तालुक्यात सर्वत्र नुकसान झाले. परंतु या विभागातील कार्लेखिंड, कनकेश्वर, रामधरणेश्वर, सागरगड, ढवर अशी मोठी जंगले निसर्गाने दिलेली संपत्ती आहे. या जंगलातील मोठमोठ्या वृक्षांनाही या चक्रिवादळाचा तडाखा बसला. यामध्ये अगदी १०० वर्षांपूर्वीचे वृक्षदेखील जमीनदोस्त झालेले आहेत.
साग, औषधी वृक्ष आदी वृक्षांचा समावेश आहे. तोडमोड झालेल्या वृक्षांचा अंदाज लावणे कठीण आहे; पण नुकसान मोठे झाले आहेत.
जंगल ही नैसर्गिक संपत्ती आहे आणि यामुळेच निसर्गातील समतोल राखला जातो. या चक्रिवादळात तुटलेली झाडे किंवा फांद्या, वेली या सुकल्यावर वणवा लागतो, त्यामुळे वनसंपदेचा ºहास होतो. हे टाळण्यासाठी त्यावर काही तरी उपाय वनविभागाकडून करावे, असे मत वृक्षप्रेमींचे आहे. जंगलातील चक्रिवादळातून झालेल्या वृक्षहानीबाबत वनविभागामार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच या बाबतची माहिती प्रत्येक राखीव वने असतात, त्यांच्याकडून वनविभागाकडे दिलेली आहे, असे वनविभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलेले आहे.
नैसर्गिक आपत्तीपुढे आपण काही करू शकत नाही. प्रत्येकाने या बदल्यात एका तरी वृक्षाची लागवड करणे, असे मत निसर्गप्रेमी डॉ. बकुळ पाटील यांनी व्यक्त केले. चक्रिवादळाचा तडाखा इतका तीव्र होता की, कुणाच्याही लक्षात येणारी ही बाब आहे की जंगलातील वृक्षांची परिस्थिती काय असेल.
या आपत्तीपासून नुकसान होऊ नये, म्हणून रस्त्यालगत टाकळा किंवा इतर कमकुवत वृक्षांची लागवड करू नये. अशा ठिकाणी उत्तम जातीच्या वृक्षांची लागवड करावी, ज्यामुळे आपत्तीपासून धोका व नुकसान होणार नाही, अशी सूचना वृक्षप्रेमी प्रा. उदय मानकवळे यांनी व्यक्त केली.