मधुकर ठाकूर
उरण : उरण तालुक्यातील पाणजे येथील जागेवर जेएनपीटीने समुद्रामुळे होणारी धूप थांबविण्यासाठी सरंक्षक भिंत उभारून तटबंदी करण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे पाणजे परिसरातील पाणथळी जागा, दीड हेक्टर क्षेत्रावरील दुर्मीळ मॅनग्रोव्हची झाडे, सुमारे दीड लाख पक्ष्यांची घरटी, मोठ्या प्रमाणात सागरी जीवजंतू नष्ट आणि पारंपरिक पद्धतीने सुरू असलेली मासेमारीही धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणजे येथील प्रस्तावित सरंक्षक भिंतीचे काम बंद करून पाणजे पर्यावरणप्रेमी संघटना आणि ग्रामस्थांनी जेएनपीटीकडे तक्रार केली आहे. त्यामुळे जेएनपीटीचे प्रस्तावित पाणजे संरक्षण भिंतीचे काम अडचणीत आले आहे.
जेएनपीटी बंदरामुळे समुद्रकिनाऱ्यावरच वसलेल्या पाणजे गावाची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. बंदराच्या विविध विकासकामांसाठी सातत्याने होणाºया माती-दगडाच्या भरावामुळे समुद्राच्या भरतीच्या पाण्याची पातळी वाढतच चालली आहे. यामुळे सात हजार वस्तीच्या पाणजे गावालाच धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारीनंतर जेएनपीटीने समुद्राच्या भरतीच्या पाण्यामुळे पाणजे गावाची धूप थांबविण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुमारे साडेचार कोटी खर्चाच्या प्रस्तावित कामाच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत.
या आधीच वनशक्ती, श्री एकवीरा आई प्रतिष्ठान, पारंपरिक मच्छीमार बचाव कृती समिती-उरण, नॅट कनेक्ट फाउंडेशन आदी विविध पर्यावरणवादी संघटनांनी संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाला विरोध दर्शविला आहे. जेएनपीटीच्या पाणजे गावासभोवार उभारण्यात प्रस्तावित सरंक्षक भिंतीच्या कामामुळे दुर्मीळ पक्ष्यांसाठी विपुल प्रमाणात खाद्यपदार्थ आढळणाºया पाणथळी जागा नामशेष होण्याची भीती पर्यावरणवादी संघटनांनी व्यक्त करण्यात आली आहे. दीड हेक्टर क्षेत्रावरील दुर्मीळ मॅनग्रोव्हची झाडेही नष्ट होणार आहेत, तसेच सुमारे दीड लाख पक्ष्यांची घरटी आणि मोठ्या प्रमाणात सागरी जीवजंतू नष्ट होणार आहेत. त्याचबरोबर, पारंपरिक पद्धतीने सुरू असलेली मासेमारीही धोक्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत या आधीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत, तर पाणजे येथील प्रस्तावित संरक्षक भिंतीच्या कामामुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाºया स्थानिक शेकडो मच्छीमारांवर विपरित परिणाम होणार आहे. यामुळे जेएनपीटीच्या प्रस्तावित संरक्षण भिंत उभारण्याच्या कामाला विरोध असल्याची माहिती पारंपरिक मच्छीमार बचाव कृती समितीचे सेक्रेटरी दिलीप कोळी यांनी दिली.
जेएनपीटीच्या प्रस्तावित संरक्षण भिंत उभारण्याच्या कामाला विविध पर्यावरणवादी संघटनांनी दर्शविलेल्या विरोधानंतर महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट आॅथॉरिटी विभागाने पर्यावरणवादी संघटनांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांवर जेएनपीटी प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. त्यामुळे जेएनपीटीच्या प्रस्तावित पाणजे संरक्षण भिंतीचे काम अडचणीत आले आहे.पाणथळी जागांचे आरक्षण जाहीर करावेनिसर्गाचा समतोल राखण्यासाठी, स्थलांतरित पक्ष्यांची वास्तव्याची ठिकाणे वाचविण्यासाठी पाणजे-डोंगरी, बेलपाडा, भेंडखळ तर सीवूड परिसरातील चाणक्य ट्रेनिंग स्कूल, एनआरआय कॉम्प्लेक्स या पाच पाणथळी जागांचे आरक्षण जाहीर करून पक्षी अभयारण्य घोषित करावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट आॅथॉरिटी विभाग, वनविभागाच्या मुंबई मॅन्ग्रोज सेलकडे केली होती.पाणथळी, दळी जागांचे आरक्षण जाहीर करण्याबाबत सिडको अधिकारी व ठाणे, रायगड जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश, त्याच वेळी वनविभागाच्या मुंबई मॅन्ग्रोज सेलने दिले असल्याची माहिती नॅट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन.कुमार यांनी दिली.