व्यंगमुक्तीमुळे १५९ जणांचे आयुष्य बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 11:47 PM2019-03-03T23:47:10+5:302019-03-03T23:47:14+5:30

विद्रूपता आणणाऱ्या जखमा, हाता-पायांतील वाकडेपणा आदी शारीरिक समस्यांवर ‘प्लास्टिक सर्जरी’करून आयुष्य पुन्हा एकदा नव्याने फुलविता येऊ शकते;

Due to deletion, the lives of 159 people changed | व्यंगमुक्तीमुळे १५९ जणांचे आयुष्य बदलले

व्यंगमुक्तीमुळे १५९ जणांचे आयुष्य बदलले

Next

- जयंत धुळप
अलिबाग : दुभंगलेले ओठ आणि टाळू, भाजल्याने शरीराच्या दर्शनी भागांवर आणि विशेषत: चेहऱ्यांवर निर्माण झालेले व्रण आणि विद्रूपता आणणाऱ्या जखमा, हाता-पायांतील वाकडेपणा आदी शारीरिक समस्यांवर ‘प्लास्टिक सर्जरी’करून आयुष्य पुन्हा एकदा नव्याने फुलविता येऊ शकते; परंतु ही शस्त्रक्रिया मोठी खर्चिक आणि मुंबई-पुण्या सारख्या शहरातील रुग्णालयातच उपलब्ध असल्याने अल्प उत्पन्नगटातील गरीब माणूस या शस्त्रक्रिया करवून घेण्याचा विचारही करू शकत नाही.
ग्रामीण भागातील लोकांमधील व्यंगांची समस्या, मूळ अलिबाग तालुक्यातील सारळ येथील रहिवासी आणि जागतिक कीर्तीचे प्लास्टिक सर्जरीतज्ज्ञ डॉ. नितीन मोकल यांनी जाणली आणि अलिबाग परिसरातच अशा व्यक्तींवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय मोकल यांनी घेतला.
डॉ. नितीन मोकल हे मुंबईतील नामांकित बॉम्बे, वाडिया, सुश्रुषा, जी.टी. रुग्णालयासह परदेशातील विविध रुग्णालयांत शस्त्रक्रिया करतात. अलिबागच्या ग्रामीण भागात या शस्त्रक्रिया कुठे कराव्या, हा प्रश्न असतानाच अलिबाग जवळच्या कार्लेखिंड येथील प्रयास रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रवींद्र म्हात्रे यांनी आपले आॅपरेशन थिएटर व संपूर्ण रुग्णालय कर्मचाऱ्यांसह मोफत उपलब्ध करून देण्याचे सामाजिक उत्तरदायित्व निभावले. केवळ प्लास्टिक सर्जरीतज्ज्ञ डॉ. नितीन मोकल यांनी येऊन शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते कारण या शस्त्रक्रिया करण्याकरिता अन्य शाखांचे डॉक्टर्स गरजेचे असतात, त्याकरिता अलिबागमधील ज्येष्ठ सर्जन डॉ. एस. एन. तिवारी, भूलतज्ज्ञ डॉ. संचिव शेटकार, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत वाजे, बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र चांदोरकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. विनायक पाटील, डॉ. रवींद्र म्हात्रे, भूलतज्ज्ञ डॉ. सुजाता मोकल, डॉ. शैलेश पालकर यांनी आपली वैद्यकीय साधनसामुग्री व औषधांसह या शस्त्रक्रिया शिबिरात विनामानधन सहभागी होण्याची तयारी दाखवली. त्यामुळे जवळपास १५९ जणांवर ही यशस्वी मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.
पहिले संपूर्ण मोफत व्यंगमुक्ती शिबिर प्रयास रुग्णालयात २००९ मध्ये झाले आणि त्यात ग्रामीण भागातील २३ स्त्री-पुरुषांना व्यंगमुक्ती पूर्णत: मोफत प्राप्त होऊन त्यांचे आयुष्य खºया अर्थाने फुलले. त्यानंतर २०१३ मध्ये ३७, २०१६ मध्ये ५३ आणि गेल्या दोन दिवसात झालेल्या शस्त्रक्रिया शिबिरात ४0 ग्रामीण व्यंगग्रस्तांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आणि त्यांच्या आयुष्यात आनंद फुलल्याची माहिती प्लास्टिक सर्जरीतज्ज्ञ डॉ. नितीन मोकल यांनी दिली आहे.
>जन्मत: व्यंगयुक्त अपत्ये जन्मास येऊ नये, याकरिता नवविवाहित दाम्पत्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. विवाहानंतर गर्भधारणा व अपत्यप्राप्ती या पूर्वीच्या काळात उभयतांंनी आरोग्य विषयक दक्षता सुयोग्य प्रकारे घेतली पाहिजे. आपल्या शरीरास गरजेच्या नसलेल्या गोष्टी आहार वा व्यसनांतून आपल्या शरीरात जाणार नाहीत याची दक्षता घेतल्यास नवजात अपत्यांतील व्यंग टाळता येऊ शकते.
- डॉ. नितीन मोकल, प्लास्टिक सर्जरीतज्ज्ञ

Web Title: Due to deletion, the lives of 159 people changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.