खोदकामामुळे महामार्गावरील वीज खांब धोकादायक स्थितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:37 PM2019-05-13T23:37:41+5:302019-05-13T23:39:49+5:30
महाड तालुक्यातील केंबुर्ली गावातील एका वळणाचे खोदकाम करताना वीज खांबालगतची माती मोठ्या प्रमाणात काढण्यात आल्याने वीज प्रवाह सुरू असलेले तीन खांब महामार्गालगत अधांतरी लटकत आहेत.
- सिकंदर अनवारे
दासगाव : मुंबई - गोवा राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यापूर्वी रस्त्यालगतचे विजेचे खांब ठेकेदाराने स्थलांतरित करणे गरजेचे आहे. महाड तालुक्यातील केंबुर्ली गावातील एका वळणाचे खोदकाम करताना वीज खांबालगतची माती मोठ्या प्रमाणात काढण्यात आल्याने वीज प्रवाह सुरू असलेले तीन खांब महामार्गालगत अधांतरी लटकत आहेत. हे तीनही खांब कोसळण्याच्या स्थितीत असून अपघाताची शक्यता आहे. शिवाय त्यामुळे परिसरातील पाच हजार ग्राहकांना फटका बसण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्गालगतचे गाव तसेच बांधकामांना काही अंतरावर असलेल्या विजेच्या खांबावरून जोडणी करण्यात आली होती. चौपदरीकरणासाठी संपादित जमिनीमध्ये हे वीज खांब व वाहिन्या अडथळा निर्माण करत होते. त्यामुळे हे संपादित करण्यात आलेल्या जागेच्या शेवटच्या भागात उभारणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे ठेकेदार कंपनीने बहुतेक ठिकाणी खांब उभारले. मात्र नवीन वीजवाहिन्या अद्याप जोडण्यात आलेल्या नाही.
सध्या केंबुर्ली गाव हद्दीत एका वळणावर चौपदरीकरणाच्या कामासाठी रस्ता रुंदीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. गेल्या वर्षी याच ठिकाणी खोदकाम झाल्याने पावसाळ्यात दरड कोसळून सरळ सरळ महामार्गावर येऊन कोसळली होती. या दरडीसोबत दोन विजेचे खांब रस्त्यावर येऊन कोसळले होते. महामार्ग पाच तास बंद पडला होता. तर विजेच्या वाहिनीवर असलेले वहूर सेक्शन (विभाग) मधील पाच हजार वीज ग्राहकांना याचा फटका सहन करावा लागला होता. पुन्हा पावसाळ्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. त्या ठिकाणाहून एकूण सहा विजेचे खांब वहूर सेक्शनमधील दासगाव, वहूर, वीर, टोळ,
दाभोळ या गावातील पाच हजार ग्राहकांसाठी वीजवाहिनी घेऊन जातात.
नवीन करण्यात आलेल्या खोदकामामुळे तीन वीज खांब अधांतरी उभे आहेत. यापुढे ते कधीही कोसळण्याची शक्यता नाक ारता येत नाही. नवीन खांब दुसऱ्या बाजूने उभे करण्यात आले आहेत. मात्र अद्याप जोडणी करण्यात आलेली नाही. यासंदर्भात परिसरातील ग्रामस्थांकडून तोंडी अथवा लेखी तक्रारी महावितरणकडे करण्यात आलेल्या आहेत. महावितरण तसेच ठेकेदार कंपनीने पावसाळ्यापूर्वी ही समस्या दूर करावी, अशी सामान्य नागरिकांकडून मागणी केली जात आहे.
चौपदरीकरणाच्या वहूर सेक्शन ते पोलादपूर ग्रामीणपर्यंत या कामासाठी ४७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून महावितरणने आधुनिक पद्धतीत लाइन टाकून घेत पुढील अनेक वर्षांपर्यंत कोणत्याही तºहेची वीजवाहिन्यांना अडथळा येऊ नये या पद्धतीत ठेकेदार कंपनीकडून काम करून घेण्यास सुरुवात केली. मात्र ठेकेदार कंपनीने ही रक्कम जास्त असून एवढा खर्च अपेक्षित नसल्याचा गवगवा करत महावितरणने सुचविलेल्या कामामध्ये कपात करत ४७ कोटींवरून २९ कोटींवर आणली आहे.
- पांडुरंग बोके, प्रभारी उपकार्यकारी अभियंता, महावितरण महाड विभाग