धरणाच्या निधीअभावी पाणीटंचाई, वाशी खारेपाट विभागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 06:53 AM2018-04-06T06:53:39+5:302018-04-06T06:53:39+5:30
पेण तालुक्यातील शहापाडा धरणाच्या खर्चासाठी आवश्यक निधी मिळत नसल्याने वाशी विभाग, वडखळ विभागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची झळ सोसावी लागत आहे.
- सुनील बुरूमकर
कार्लेखिंड - पेण तालुक्यातील शहापाडा धरणाच्या खर्चासाठी आवश्यक निधी मिळत नसल्याने वाशी विभाग, वडखळ विभागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची झळ सोसावी लागत आहे.
मार्च महिन्यापासून सर्वत्रच पिण्याच्या पाण्याची बोंब सुरू होते. कोकणात पाऊस पडतो, परंतु पाणी साठवण व्यवस्था चांगली नसल्याने पावसाचे पाणी नाल्यावाटे समुद्राला मिळते. कोकण विभाग अतिवृष्टीचा असला तरी पाण्याची झळ सोसावी लागते. पेण तालुक्यात मोठी धरणे आहेत. परंतु या तालुक्यातील जनता पाण्यावाचून नेहमीच तडफडत असते. जलसंपदा, पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा यांचा समन्वय आणि नियोजन नसल्याने ही परिस्थिती आहे.
शहापाडा धरण पाणी योजनेस हेटवणे धरणातून पाण्याचा साठा उपलब्ध करुन दिल्यास, या धरणातून वडखळ व वाशी विभाग कधीच पिण्याच्या पाण्यास वंचित राहाणार नाही. परंतु या धरणाच्या दुरुस्तीसाठी किंवा पाणीपुरवठा वाढविण्यासाठी आवश्यक निधी यंत्रणेला उपलब्ध होत नाही. त्यामुळे सुधारणा करण्यासाठी अनेक अडथळे आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा राजिप उपविभाग यांच्या अंतर्गत या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहापाडा धरणामध्ये पाण्याचा साठा कमी असल्यामुळे हेटवणे धरणाच्या सिंचनाच्या कालव्यातून ३५ एचपी आणि २५ एचपीच्या दोन पंपाद्वारे धरणामध्ये पाणी सोडले जाते आणि ते पाणी शुद्ध करून टाकीमध्ये साठविले जाते. परंतु शुद्ध केलेले पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अपुरे पडते. त्यामुळे या गावांना दोन ते तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येतो.
पाणी शुद्धीकरण यंत्रणेविषयी शाखा अभियंता आर. एम. राठोड म्हणाले, पाणी पूर्णत: शुद्ध होत नाही हे सत्य आहे. त्यासाठी पंप मशिन, रेती, फिल्टर आदी लागणाऱ्या बाबींचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. राठोड पुढे म्हणाले, तीस कोटी रुपयांच्या मंजूर प्रकल्पामध्ये वाढीव शहापाडा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा समावेश आहे आणि हे काम महाराष्टÑ जीवन प्राधिकरण अंतर्गत होणार आहे. यासाठी साधारणत: दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. या योजनेमुळे वडखळ व वाशी विभाग पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही.
सध्या वाशी खारेपाटातील जनतेचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांना रात्री बारा ते दोन वाजेपर्यंत जागावे लागते. पाण्याचा दाब कमी असल्याने छोटे पंप लावावे लागतात. तसेच अनेक ठिकाणी पाइप गळती असल्याने शेतातील खारे पाणी शिरून पिण्याचे पाणी दूषित देखील होते. अशामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. नोकरीनिमित्त बाहेर असलेले लोक गावी जाताना मिनरल पाण्याच्या बाटल्या घेवून जातात. मिळणारे पाणी कमी असल्यामुळे जनावरांचे सुद्धा हाल होत आहेत. अशी गंभीर परिस्थिती या विभागातील जनतेची आहे.
हेटवणे धरणातील कालव्याद्वारे आलेले पाणी हे सिंचनासाठी असले तरी त्यातून पिण्याच्या पाण्यासाठी शहापाडा धरणात पंपाद्वारे पाणी सोडले जाते, अशी माहिती महाराष्टÑ शासनाच्या जलसंपदा विभाग उपविभागीय अधिकारी हेटवणे कालवा उपविभाग-१ उंबडे पेण या कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
हेटवणे कालवा कार्यालयाच्या अंतर्गत अठरा किमी अंतरातील भाग येतो. हेटवणे धरणातून रोज ३ हजार २५१ क्युसेक पाणी सिंचनासाठी सोडले जाते. तसेच याचा दुसरा उपयोग पानेड येथील वीजनिर्मिती प्रकल्पासाठी केला जातो. त्यामुळे रोज याच दाबाने पाणी सोडले जाते.
प्राधिकरणाच्या नियोजनाअभावी हेटवणे धरणातील पाणी नाल्यावाटे खाडीत जाते
आम्हाला योग्य दाबाने पाणी सोडले नाही तर शहापाडा या विभागातील शेतकºयांना पाणी देता येणार नाही,अशी माहिती जलसंपदा विभागाचे कनिष्ठ अभियंता झेड. एच. म्हैसकर यांनी दिली.
पाणी वाया जाण्याचे कारण सांगताना म्हैसकर म्हणाले, अठरा किमी अंतरातील शेतकºयांना पाणी देवू नये अशी लेखी तक्रार रोडे व काश्मिर या ग्रामस्थांनी केलेली आहे. कारण सततच्या दलदलीमुळे आमची शेती सुपीक राहणार नाही. त्यामुळे आम्हाला या धरणाच्या शेजारी बांध घालावा लागला आहे आणि येणारे पाणी नाईलाजाने सोडावे लागत आहे.