-गणेश चोडणेकर गणेशोत्सव सण हा कोकणात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या सणाला कामानिमित्त बाहेरगावी, तसेच देश-परदेशात असणारे चाकरमानी आपल्या मूळ गावी येतात. कोकणात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. १० दिवस येथे प्रसन्न वातावरण असते, तर गावे गजबजलेली असतात. महाराष्ट्रातील इतरही विभागांत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ, मराठवाड्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा के ला जातो. याच काळात गौराईचीही स्थापना केली जाते. त्यामुळे गौरी-गणपतीचा सण असेही संबोधले जाते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही गणेश उत्सवाचा आनंद सर्वत्र ओसंडून वाहत आहे. मुंबई, ठाणे, बोरीवली, विरार व पुणे येथे राहणारे चाकरमानी लॉकडाऊनमध्ये आपल्या गावीच आलेले आहेत. मुरुड तालुक्यातील मुंबई, ठाणे या शहरांत कामास असलेल्या माणसांची संख्या हजारोंच्या वर असल्याने, सर्वच जण गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात शासनाच्या नियमाप्रमाणे साध्या पद्धतीने साजरा करणार आहेत. जून महिन्यातच गणपती चित्रशाळांकडे आॅर्डर बुक केल्याने आपल्या गणरायाचे रंगकाम कसे केले आहे, हे पाहण्यासाठी लोक चित्रशाळांतही जाताना दिसत आहेत.येत्या २२ आॅगस्टला लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून मूर्ती बनविण्यास कारागिरांनी सुरुवात केली होती. त्यांच्या कामाला आता चांगलीच गती आली आहे. मूर्ती कारागीर शेवटचा हात फिरविण्याच्या कामात मग्न आहेत. अनेक कारागिरांकडे मूर्तींचे रंगकामही पूर्ण झाले आहे. डायमंड चमकी, सिल्व्हर आॅइल रंगाने मूर्ती सजविण्यात कारागीर व्यस्त आहेत. गणेशमूर्तींमध्ये दरवर्षी भक्तांचा ट्रेण्ड बदलत असतो. या वर्षी लालबागचा राजा, मयूरासन, फेटेवाला गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती अशा असंख्य मूर्ती भाविकांना आकर्षित करीत आहेत. वस्त्र-अलंकारांनी सजलेल्या मूर्तीही पसंतीस पडत आहेत. मुरुड शहरात फक्त शाडूच्या गणेशमूर्तींना खूप मागणी आहे. या वर्षी कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका मूर्तिकारांनाही बसला आहे, तसेच गणेशभक्तही अतिशय साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदा उत्साह पाहायला मिळणार नाही. मूर्तिकार छोट्या मूर्ती बनविण्यावरच जास्त भर देत आहेत. तीन फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तीच या वेळी बनविल्या जात आहेत.मुरुड नगर परिषदेने गणपती उत्सवाबाबत नियमावली तयार केली असून, त्याप्रमाणे लोक त्याची अंमलबजावणी करणार आहेत. प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांना याबाबत सूचनापत्र पाठविण्यात आले आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी उत्साह अतूट असला, तरी शासनाच्या नियमांचे पालन करून गणरायाचे आगमन व विसर्जन होणार आहे.
गणेशोत्सवामुळे कोरोनाच्या काळातही आनंदाला आले उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 11:55 PM