रायगडमध्ये विसर्जनासाठी प्रशासनाची चोख व्यवस्था, कोरोनामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 01:33 AM2020-09-01T01:33:43+5:302020-09-01T01:39:56+5:30
गणेशोत्सवाच्या कालावधीत गर्दी होणार हे गृहीत धरून सरकार आणि प्रशासनाने विविध निर्बंध व अटी लागू केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये बाप्पाचे आगमन अगदी साधेपणाने झाले.
रायगड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला आहे. मंगळवारी दहा दिवसांच्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये विसर्जन शांततेत पार पडावे, यासाठी सुमारे दोन हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, स्थानिक प्रशासनानेही विसर्जन स्थळी तयारी पूर्ण केली आहे.
गेल्या दहा दिवसांपासून बाप्पाचा उत्सव सुरू आहे. मार्च महिन्यापासूनच कोरोनाचा विळखा जिल्ह्यात घट्ट होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गाचा आकडा हा दिवसाला सुमारे ४००पर्यंत पोहोचला आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत गर्दी होणार हे गृहीत धरून सरकार आणि प्रशासनाने विविध निर्बंध व अटी लागू केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये बाप्पाचे आगमन अगदी साधेपणाने झाले. त्याचप्रमाणे, नेहमीप्रमाणे मोठ्या संख्येने नातेवाईक-मित्रमंडळी यांची ये-जा नसल्याने बाप्पाचे आगमन झालेल्या घरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये चांगलीच शांतता होती.
जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ५० ते १०० वर्षे झाली आहेत. मात्र, कोरोनामुळे या ठिकाणीही कसालाही गाजावाजा दिसून आला नाही. दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून सत्यानारायण पूजेचे आयोजन करण्यात येते. त्यालाही बहुतांश मंडळांनी बगल दिली आहे. काही मंडळांनी तर दीड तर काही मंडळांनी पाच दिवसांनी बाप्पाला निरोप देण्यात येतो. त्याच दिवशी दहा दिवसांच्या बाप्पाला ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असा निरोप दिला आहे.
नेहमीप्रमाणे होणारे, विविध मनोरंजनाचे, सांस्कृतिक कार्यक्रम, भजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले होेते. त्यामुळे मंडपांमध्ये शांतता होती. बाप्पाच्या आगमनाच्या वेळीही कोणी मिरवणुका काढल्या नाहीत, अथवा विसर्जनाच्या दिवशीही डीजे, ढोल-ताशा पथकाच्या माध्यमातून तामझाम केला नाही. काही भाविकांनी नदी, तलाव समुद्र अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊन विसर्जन करण्याऐवजी कृत्रिम तलाव, अथवा मोठ्या टबमध्येच विधीपूर्वक विसर्जन केले.
नागरिकांनी कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून बाप्पाला निरोप द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दोन हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात
रायगड जिल्ह्यात १४४ सार्वजनिक तर १३ हजार ८४८ खासगी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. हा आकडा मोठा दिसत असल्याने, पोलीस प्रशासनानेही तयारी केली आहे. जिल्ह्यात सुमारे दोन हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात आहेत. त्यामध्ये सहा पोलीस उपविभागीय अधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक हे स्वत: जिल्ह्याच्या विविध ठिकाणी लक्ष ठेवणार आहेत. त्याचप्रमाणे, स्थानिक पोलीस ठाण्याचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
जीवरक्षकांकडे सोपवा बाप्पाची मूर्ती
विविध ठिकाणांच्या विसर्जन स्थळांवर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून मंडप उभारण्यात आले आहेत. अलिबाग नगरपालिकेने समुद्र किनारी टेबल मांडले आहेत. तेथील जीवरक्षकांकडे बाप्पाची मूर्ती सोपवायची आहे. तेच बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करणार आहेत. कोणीही विसर्जन स्थळी गर्दी करणार नाहीत, यावर स्थानिक पोलीस नजर ठेवणार आहेत. मुख्य विसर्जन स्थळाकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेटस लावून पोलीस तैनात राहणार आहेत.
भाविकांसाठी ध्वनिक्षेपकावरून सूचना : नगरपालिकेकडून सातत्याने भाविकांसाठी ध्वनिक्षेपकावरून सूचना देण्यात येणार आहेत. त्यांनी मांडलेल्या टेबलवरील कर्मचाऱ्यांकडे बाप्पाची मूर्ती, तसेच निर्माल्य सोपावायचे आहे.