रोहा - तब्बल एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या मुसळधार पावसाने रोहा परिसरात चक्काजाम केला. रोहा शहरातील ठिकठिकाणी साठलेल्या पाण्याने संपूर्ण नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. रोहा, वरसेत सर्वत्र पाणीच पाणी झाले. जंगलपट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसाने कुंडलिकेला अंशत: पूर आला. दुसरीकडे काही तास झालेल्या पावसाने रोहा, अष्टमी नगरपरिषद प्रशासनाची फजिती केली. शहरात जंगल भागातून आलेल्या पाण्याला नदीकडे जाण्यासाठी वाट न मिळाल्याने नेहमीप्रमाणे दमखाडी, मिराज हॉटेल, पंचायत समिती रोहा, मेहेंदळे विद्यालय, बोरीची गल्ली, रोहा तलाठी कार्यालय भागात पाणी साठले आणि नगरपरिषदेच्या नियोजनाचा धज्जा उडाल्याचे चित्र समोर आले.शुक्रवारी पहाटेपासून रोहा शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला. कुंडलिका नदी, उपनद्या, ओहळ, नाल्यांना पूर आला. निवी जंगलपट्ट्यातून मुसळधार पाणी दरवर्षीप्रमाणे वरसे हद्दीत शिरले. एकतानगर, ध्रुव हॉस्पिटल, सातमुशी नाला व इतरत्र ठिकाणी पावसाच्या पाण्याने नागरिकांची पळता भुई थोडी केली. निवी, भुवनेश्वरलगत कालव्याच्या पाण्याने आणि वरसोलीतील प्रमुख सातमुशी नाल्यावर बिल्डरांनी अतिक्रमण केल्याने आणीबाणीचे दृश्य पाहायला मिळाले. या उलट रोहा शहरात विकासाची कामे सुरू आहेत, त्या कामाच्या नावाखाली जागोजागी रस्ते फोडले, त्यातील बहुतांश रस्ते अद्याप खड्ड्यात गेले. खोदलेले रस्ते त्यावर पाण्याने अतिक्रमण केल्याने शालेय विद्यार्थी, नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. तर दमखाडी नाका मिराज हॉटेलसमोर, स्टेट बँक आॅफ इंडिया, पंचायत समितीच्या रस्त्यावर तीन-तीन फूट पाणी साचल्याने हीच का विकासकामे? असा संतप्त सवाल रोहेकरांनी केला आहे.सकाळी ११ च्या सुमारास अनेक वस्तीत पाणी शिरले, तर रात्री अधिक पाऊस पडल्यास शहरातील अनेक वस्तीत पाणी शिरण्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्यासाठी नगरपरिषद प्रशासन सज्ज झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.मुसळधार पावसाने खोपोलीकरांना झोडपलेखोपोली : शुक्रवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खोपोलीकरांना चांगलेच झोडपून काढले, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक सखल भागात पाणी साचले होते. काही घरांमध्ये पाणी शिरले तर भानवज जवळील कमला रेसिडेन्सीमध्ये दरड कोसळल्याची घटना घडली. गुरु वारपासून खोपोली आणि परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.शिळफाटा येथील डी.सी. नगर येथे रस्त्यावर पाणी साचले होते, त्यामुळे रस्त्यावरून मार्ग काढणे कठीण झाले होते. कृष्णानगर येथे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले. शहरातील भानवज परिसरातील डोंगर फोडून बांधण्यात आलेल्या कमला रेसिडेन्सी या इमारतीमध्ये दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सिद्धार्थनगर येथे भिंत पडल्याची घटना घडली.पावसामुळे झाले जनजीवन विस्कळीतमोहोपाडा : जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला. शुक्रवारी सकाळपासूनच रसायनी व आसपासच्या परिसरात पावसाची मुसळधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. दिवसभरात पावसाची संततधार सुरू असल्याने ठिकठिकाणी पाणी साचल्याने व पूरसदृश परिस्थिती निर्माण होणार की काय, अशी भीती नागरिकांच्या मनात होती.पावसाने दांड-रसायनी रस्त्यावरील जुनाट झाडाच्या फांद्या गळून पडल्याचे चित्र दिसून आले. अति पावसामुळे संभाव्य धोके लक्षात घेत वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. कांबे रिसर्च गावाच्या हद्दीत विजेच्या खांबाला वाहनाची ठोकर लागल्याने कोसळला. या वेळी खबरदारी म्हणून शिवनगर ते रिसपर्यंतचा वीजपुरवठा ३ वाजेपर्यंत खंडित केला होता.पावसाचा जोर शुक्रवारी कायम राहिल्याने इनॉक्स कंपनीत पाणी शिरले. एमआयडीसी हद्दीतील सिद्धेश्वरी ते पीटीआय रिलायन्स या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने पाणी साचून इनॉक्स कंपनीत शिरले. तर भारतीय स्टेट बँक समोरील नाला तुंबल्याने पाणी रस्त्यावर आले होते.कर्जत नगरपरिषद हद्दीतील १३५ घरांना दरडीचा धोका१कर्जत : पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे दरडी कोसळ्याची शक्यता लक्षात घेऊन त्याची खबरदारी म्हणून नगरपरिषद प्रशासनाने नगरपरिषद हद्दीतील १३५ घरांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांनी अन्य सुरक्षित ठिकाणी राहण्यास जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.२नगरपरिषद हद्दीत मुद्रे- बुद्रुक, गुंडगे आणि भिसेगाव या ठिकाणी टेकडी खाली वस्ती, घरे आहेत. पावसाळ्याच्या दिवसात टेकडीची दरड कोसळून नैसर्गिक दुर्घटना घडून जीवित व वित्तहानी होण्याचा संभव आहे. दक्षता म्हणून नगरपरिषद हद्दीतील मुद्रे- बुद्रुक, गावातील ७०, गुंडगे गावातील ५९ आणि भिसेगाव गावातील सहा अशा एकूण १३५ घरांना नोटीस देण्यात आल्या आहेत.३पावसाळ्यात या टेकडीची दरड कोसळून तुमच्या घराचे नुकसान होण्याचा संभव आहे, तुम्ही त्वरित अन्य सुरक्षित ठिकाणी राहण्यास जावे अन्यथा दुर्घटना घडून जीवित व वित्तहानी झाल्यास त्यास सर्वस्वी तुम्ही जबाबदार राहाल असे नोटीसमध्ये नमूद केले आहे.पावसामुळे पेणमधील रोपवाटिकांना जीवदानपेण : चातकासारखी प्रतीक्षा करायला लावणारा पाऊस अखेर शुक्रवारी सकाळपासून पेणमध्ये रिमझिम सुरू झाला. दुपारी ११.३० वाजता आभाळ ढगांनी भरून आले होते, त्यामुळे पाऊस पडणार असे चित्र दिसत होते. मात्र, त्यानंतरही उशिरापर्यंत पुन्हा पश्चिम बाजूकडील आकाशात ढगांची गर्दी झाली आणि अखेर जोरदार सरीवर सरी कोसळत पाऊस सुरू झाला. पाऊस पडताच शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला. गेले २१ दिवस पावसाने दडी मारल्याने नर्सरी रोपांना कडक उन्हाचा सामना करावा लागला. त्यात रोपवाटिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या रोपांना पावसाची प्रतीक्षा होती ती पडलेल्या जोरदार पावसात पूर्ण झाली. हवेत गारवा निर्माण झाल्याने रोपवाटिकांना जोरदार सरींनी जीवदान देऊन त्या प्रफुल्लित दिसत होत्या. या पावसामुळे शेतकºयांनी सुटकेचा श्वास सोडला असून, आता शेतीच्या मशागतीसाठी तो सज्ज झाला आहे. पावसाच्या शुभ आगमनाने शेतकरी सुखावला आहे. हवामान वेधशाळेने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शुक्रवारी सायंकाळपासून रात्रभर हलक्या सरींनी वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
रोह्यात जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 1:40 AM