विशेष प्रतिनिधी अलिबाग : मंगळवारी दुपारी ४ वाजल्यापासून पुढील २४ तासांत जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने रायगड जिल्हा प्रशासनास दिला आहे. मंगळवारी पावसाने जोर धरल्याने जिल्ह्यातील सावित्री, काळ, अंबा, कुंडलिका या प्रमुख नद्यांच्या पातळीतदेखील हळूहळू वाढ होत आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती व दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये जीवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधितांना रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी दिले आहेत.अतिवृष्टीमुळे झाड पडणे, पाणी थांबणे, दरड कोसळणे इत्यादी आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी बचाव पथक, साहित्य, रुग्णवाहिका आदी सुविधा, नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना दिले.>वीजतार तुटून तीन गुरांचा मृत्यूमाणगाव : संपूर्ण तालुक्यात पावसासह वारे वाहत आहे. या वादळी पावसाने गोरेगावमध्ये तीन ठिकाणी चालू वीजवाहिनी तुटून पडल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजता घडली. या घटनेत कुठलीही मनुष्यहानी घडली नाही. मात्र, गोरोबानगर येथे तीन गुरे शॉक लागून दगावली.गोरोबानगरमधील लोणाजी रातवडकर हे शेतकरी असून, त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे. त्यांची चार वर्षांची तीन जनावरे असून, एक गाय व दोन म्हशींपैकी एक म्हैस गाभण असून, एकंदरित सुधारित जातीपैकी असल्याने त्याची किंमत सुमारे दोन लाख रु पये इतकी आहे, त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.पनवेल शहराला झोडपलेपनवेल : पनवेल तालुक्याला पडलेल्या जोरदार पावसाने शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. सायन-पनवेल महामार्ग, मुंबई-गोवा महामार्गावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. अवघ्या काही तासांत पनवेल शहरात १०० मिली मीटर पावसाची नोंद करण्यात आली.मंगळवारी दुपारनंतर सुरु झालेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. सायन-पनवेल महामार्गावर कळंबोली, खारघर टोलनाक्याजवळ दोन लेन पाण्याखाली गेल्याने वाहतुकीला काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला. सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याने घरी परतणाºया नोकरदार वर्गाचे हाल झाले.पासाने उसंत घेतल्याने बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले होते. मात्र, पावसाने कामात अडथळा आणल्याने सायन-पनवेल महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरणार आहे. कळंबोली शहरात काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते.विद्युत पोल कोलमडलेबिरवाडी : महाड एमआयडीसी मध्ये परतीच्या पावसाचा तडाखा बसला असून, विद्युत पोल कोलमडले आहेत.महाड परिसरात सोमवारपासूनच पावसाने जोर धरला आहे. याचा फटका विद्युत वितरण कंपनीच्या विद्युत वाहिनीला बसला आहे. यामुळे महाड एमआयडीसीतील विद्युत पोल कोलमडले असून, विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे नागरिकांना रात्रअंधारात काढावी लागणार आहे.
कोकणातील नद्यांच्या पातळीत वाढ, आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज; नागरिकांना सावधानतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 2:45 AM