तापमानात वाढीमुळे जिल्ह्यातील २८ धरणांनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:56 PM2019-04-28T23:56:51+5:302019-04-28T23:57:11+5:30

प्रचंड उन्हाच्या तडाख्याने तापमानामध्ये कमालीची वाढ झाल्यामुळे रायगड पाटबंधारे विभागातील २८ धरणांतील पाण्याच्या पातळीने अक्षरश: तळ गाठला आहे.

Due to the increase in temperature, the place reached by 28 dams in the district | तापमानात वाढीमुळे जिल्ह्यातील २८ धरणांनी गाठला तळ

तापमानात वाढीमुळे जिल्ह्यातील २८ धरणांनी गाठला तळ

Next

आविष्कार देसाई 

अलिबाग : प्रचंड उन्हाच्या तडाख्याने तापमानामध्ये कमालीची वाढ झाल्यामुळे रायगड पाटबंधारे विभागातील २८ धरणांतील पाण्याच्या पातळीने अक्षरश: तळ गाठला आहे. या धरणातील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता ६८.२६१ दलघमी एवढी आहे. मात्र, वाढत्या तापमानामुळे या धरणात फक्त २०.१४५ दलघमी, म्हणजेच २९.५१ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सूर्याने असेच आग ओकणे सुरूच ठेवल्यास तेथील पाणीसाठ्यांमध्ये वेगाने घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या २८ धरणांवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना नजीकच्या कालावधीत पाणीबाणीला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र आहे.

रायगड जिल्ह्यात उष्णतेचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीमध्येही कमालीची घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जमिनीवर मोठ्या प्रमाणात विंधण विहिरी खोदून त्या माध्यमातून बेसुमार पाण्याचा वापर केला जात आहे. त्याचा विपरित परिणाम पाण्याच्या पातळीवर होताना दिसत आहे. सुधागड तालुक्यातील उन्हेरे धरणाची पाणी क्षमता १.६९५ दलघमी आहे; परंतु आजघडीला ०.००१ दलघमी म्हणजेच शून्य टक्के पाणीसाठा आहे. तीच परिस्थिती म्हसळा तालुक्यातील पाभरे धरणाची आहे. धरणाची पाणी क्षमता १.७८७ दलघमी आहे; परंतु आजघडीला ०.००० दलघमी म्हणजेच शून्य टक्के पाणीसाठा आहे. श्रीवर्धन तालुक्यातील रानवली धरणातील पाण्याचा प्रवास हा तळ गाठण्याच्या दिशेने सुरू झाला आहे. धरणाची पाणी क्षमता २.२५४ दलघमी आहे. आजघडीला ०.१२९ दलघमी, म्हणजेच पाच टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

पाण्याची पातळी घसरत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. घरामध्ये पाण्याचा थेंब नसल्याने पाण्याची गरज भरून काढण्यासाठी महिलांना पिण्यासाठी मैलोन्मैलांची पायपीट करावी लागत आहे. काही आदिवासी वाड्यांवरील नागरिकांना डोहातील पाणी खरवडून घ्यावे लागत असल्याची विदारक स्थिती निर्माण झाली आहे. गावागावांमध्ये पाण्यासाठी विकतच पाणी आणावे लागत आहे. बैलगाडीमधून मोठमोठे पिंप भरून पाण्याची वाहतूक केली जात आहे, त्यामुळे पाणीपुरवठ्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजनांचे नेमके काय केले जाते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. धरणातील पाण्याने तळ गाठल्यामुळे नदी, धरणे शेजारी असणारी वनसंपदा, शेती यांनाही पाणी मिळणे कठीण झाले आहे. मुकी जनावरे, पक्षी यांनाही पाण्याची नितांत गरज आहे. मात्र, त्यांनाही पाण्याचे स्रोत शोधावे लागत आहेत. सध्या पारा वाढला आहे, त्याच्या परिणामामुळे झपाट्याने पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.

ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता नाही, त्या ठिकाणच्या नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी आठ तालुक्यांतील ३० गावे आणि १३० वाड्यांवर २० टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. विंधण विहीर खोदण्याआधी भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यावरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाते. त्याचा फायदा हजारो नागरिकांना होत आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. - संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता

टंचाई कृती आराखडा
नळपाणी योजना दुरुस्तीसाठी दहा कोटी ८२ लाख रुपये, विहिरींच्या खोलीकरणासाठी पाच कोटी दहा लाख रुपये, टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी चार कोटी ४३ लाख रुपये, नवीन विंधण विहिरी खोदणे तीन कोटी ३१ लाख रुपये आणि विंधण विहिरींची दुरुस्ती करणे यासाठी ४२ लाख ८२ हजार रुपये अशी तरतूद आहे.

पाटबंधारे विभागाच्या २८ लहान धरणांतील पाण्याचा वापर करण्यासाठी स्थानिक पातळीवरील ग्रामस्थ विविध योजना आखतात. त्याचप्रमाणे काही केंद्र आणि राज्य सरकारच्याही योजना असतात. त्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता केली जाते आणि गावातील नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जातो.

रायगड जिल्हा परिषदेने २०१८ साली जिल्ह्यातील विविध भागांमध्ये ५१० ठिकाणी विंधण विहिरी खोदण्याचे निश्चित केले होते. त्यापैकी २१० विंधण विहिरी खोदण्यात त्यांना यश आले होते. २०१९ साली नव्याने ४५० नव्याने विंधण विहिरी खोदण्याचे प्रस्ताव ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने मंजूर केले आहेत. त्याची अंमलबजावणीही मार्च २०१९ पासून सुरू करण्यात आली आहे.

Web Title: Due to the increase in temperature, the place reached by 28 dams in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.