निचरा होत नसल्याने महामार्गावर पाणीच पाणी, चौपदरीकरणामुळे गटारांच्या सफाईकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 01:49 AM2019-06-29T01:49:00+5:302019-06-29T01:49:40+5:30

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, या कामामुळे महामार्ग बांधकाम विभागाने या वर्षी पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी गटारे साफ केली नाहीत.

Due to lack of drainage, irrigation water on the highway, four-fold due to the four-way drainage cleanliness | निचरा होत नसल्याने महामार्गावर पाणीच पाणी, चौपदरीकरणामुळे गटारांच्या सफाईकडे दुर्लक्ष

निचरा होत नसल्याने महामार्गावर पाणीच पाणी, चौपदरीकरणामुळे गटारांच्या सफाईकडे दुर्लक्ष

Next

दासगाव - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, या कामामुळे महामार्ग बांधकाम विभागाने या वर्षी पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी गटारे साफ केली नाहीत. यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी झालेल्या माती भराव आणि खोदकामामुळे पावसाचे पाणी साचत आहे. या पाण्यातून वाट काढणे वाहनचालकांना त्रासदायक ठरत असून अपघाताची शक्यताही आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्याला वाट काढण्यासाठी ठेकेदार कंपनीने तत्काळ जेसीबी यंत्रणा उभी करून पाण्याचा निचरा केला.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून ऐन पावसाळ्यापूर्वी विविध ठिकाणी एल अ‍ॅण्ड टी कंपनीकडून खोदकाम झाले आहे. शिवाय माती भरावदेखील झाला आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात महामार्गावर पावसाचे पाणी साचू लागले आहे. डोंगरावरून येणारे पाणी रस्त्यावर येऊन तुंबून राहत आहे. तसेच महामार्गावर आलेले पाणीदेखील गटारात जाण्याचा मार्ग माती भरावामुळे बंद झाला आहे. महामार्गाला असणारी गटारेही साफ न केल्याने आणि या गटारात भरावाची माती पडल्याने रस्त्यावरील पाणी वाहून जात नाही. साचून राहिलेल्या पाण्याने वाहनचालक त्रस्त झाले असून अपघाताचीही शक्यता निर्माण झाली आहे.

महामार्ग बांधकाम विभागाकडून प्रतिवर्षी रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारांची साफसफाई केली जाते. मात्र, या वर्षी चौपदरीकरण कामामुळे महामार्ग बांधकाम विभागाने गटारे साफ केली नाहीत. पाण्याचा निचरा करणारी गटारे साफ न करताच आपली जबाबदारी संबंधित ठेकेदार कंपनीवर सोपवली आहे.

यामुळे इंदापूर ते पोलादपूरपर्यंत ठिकठिकाणी सखल भाग असलेल्या मार्गात पाणी साचून राहिले आहे. महाड आणि परिसरात पावसाचे प्रमाण अधिक असते. यामुळे डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोट रस्त्यावर येत असतो. या वर्षी खोदकाम झाल्याने पाण्याबरोबर मातीदेखील महामार्गावर येत आहे. यामुळे साचलेल्या पाण्यातून वाट काढताना तयार झालेल्या चिखलाने अपघात होण्याचीही शक्यता आहे. महामार्ग बांधकाम विभाग सध्या आपली जबाबदारी एल अ‍ॅण्ड टी कंपनीवर सोपवली आहे.

रस्त्यावर साचलेल्या पाण्याला जाण्यास वाट न मिळाल्याने एल अ‍ॅण्ड टी कंपनीची तारांबळ उडाली. बराच काळ महामार्ग वाहतुकीला अडचण आली. एल अ‍ॅण्ड टी कंपनीने याबाबत दखल घेत महामार्गावरील साचलेले पाणी दूर करण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Due to lack of drainage, irrigation water on the highway, four-fold due to the four-way drainage cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.