मनुष्यबळाअभावी मृत्यूला राेखणारे यंत्र पडले धूळखात; रायगड जिल्ह्यात २० व्हेंटिलेटर वापराविना पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 11:20 PM2021-04-27T23:20:46+5:302021-04-27T23:21:17+5:30
रायगड जिल्ह्यात २० व्हेंटिलेटर वापराविना पडून
आविष्कार देसाई
रायगड : जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. उपचारासाठी काेणाला ऑक्सिजन लागत आहे, तर काेणाला व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत आहे. मात्र, बेडची कमतरता जाणवत असल्याने उपचारात अडचणी येत आहेत. सरकारने रायगड जिल्ह्यासाठी २५ व्हेंटिलेटर पाठवले हाेते. मात्र, त्यातील २० व्हेंटिलेटर सध्या धूळखात पडले आहेत. आराेग्य विभागाकडे कुशल मनुष्यबळ नसल्याने व्हेटिंलेटरचा वापरच हाेत नसल्याचे समाेर आले आहे.
काेराेनाचा शिरकाव झपाट्याने हाेत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे उपचारासाठी उपलब्ध असणाऱ्या रुग्णालयामधील बेडची कमतरता जाणवत आहे. काेराेनाने स्वतःमध्ये बदल केल्याने ताे अधिक घातक झाला आहे. त्यामुळे त्याचा मुकाबला करताना थाेडे कठीण जात आहे. रुग्णांची प्रकृती खालावत असल्याने त्याला ऑक्सिजन बेडची आवश्यकता लागत आहे.
अधिकच त्रास झाल्यास रुग्णांना व्हेंटिलेटरचा सपाेर्ट द्यावा लागत आहे.
पहिल्या लाटेच्या वेळी सरकारने २५ व्हेंटिलेटर जिल्ह्यासाठी दिले हाेते. व्हेंटिलेटरवरील सपोर्ट रुग्णांसाठी वरदान ठरणारा आहे. मृत्यूला राेखण्याचे सामर्थ्य हा यंत्रामध्ये आहे. मात्र, दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटरची अतिशय गरज असतानाही त्याचा वापर हाेताना दिसत नाही. आराेग्य यंत्रणेकडे आधीच मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यातच त्यांना भागवावे लागत आहे. त्यामुळे व्हेंटिलेटर उपलब्ध असतानाही त्यांचा वापर करता येत नसल्याचे आराेग्य विभागाचे म्हणणे आहे.
एखाद्या ठिकाणी व्हेंटिलेटरची गरज आहे हे मान्य, परंतु तेथे फिजिशियन डाॅक्टर नसेल तर व्हेंटिलेटरचा उपयाेग कसा करणार, त्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचीही गरज आहे. त्यामुळे गरज असतानाही त्यांचा वापर करता येत नसल्याची खंत आराेग्य विभागातील एका डाॅक्टरने व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी कळंबाेळी येथील स्वस्थ रुग्णालयाने पाच व्हेंटिलेटरची मागणी केली हाेती. रुग्णांच्या सेवेसाठी त्याचा उपयाेग हाेणार असल्याने तातडीने स्वस्थ रुग्णालयाला कर्ज स्वरूपात व्हेंटिलेटर देऊ केल्याचे जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले. अद्यापही २० व्हेंटिलेटर शिल्लक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्ह्यात एकूण २१५ व्हेंटिलेटर बेड आहेत. रायगड ग्रामीण रुग्णालयात १८ व्हेंटिलेटर आणि पनवेल महापालिका क्षेत्रात १०१ असे एकूण ११९ व्हेंटिलेटर वापरात आहेत. काही ठिकाणच्या रुग्णालयातील रुग्णांना कधीही व्हेंटिलेटरची आवश्यकता लागू शकते. मात्र, तेथे तज्ज्ञ डाॅक्टर नसल्याने व्हेंटिलेटरचा काहीच उपयाेग हाेणार नाही. यासाठी प्रशासनाने खासगी डाॅक्टरांच्या मदतीने सरकारी रुग्णालयात व्हेंटिलेटरचा वापर करण्याचे ठरवले हाेते. मात्र, खासगी डाॅक्टर स्वतःच त्यांच्या रुग्णालयात रुग्णांना उपचार देत आहेत.