भात बियाणे उत्पादन निधीअभावी ठप्प; महाडमध्ये कृषी चिकित्सालयाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:41 AM2018-12-11T00:41:57+5:302018-12-11T00:42:01+5:30
महाडमधील कोंडीवते गावालगत असलेल्या शासनाच्या कृषी विभागाच्या चिकित्सालयाची निधीअभावी दुरवस्था झाली आहे.
- सिकंदर अनवारे
दासगाव : महाडमधील कोंडीवते गावालगत असलेल्या शासनाच्या कृषी विभागाच्या चिकित्सालयाची निधीअभावी दुरवस्था झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळणे कठीण झाले आहे. गेली दोन वर्र्षांपासून या केंद्राला निधी उपलब्ध झालेला नाही. यामुळे निधीच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रात यावर्षी भात बियाणांचे उत्पादन देखील झालेले नाही.
महाड तालुक्यात कृषी विभागाकडून निर्माण करण्यात आलेल्या तालुका बीज गुणन केंद्राला गेली दोन वर्षे निधी न प्राप्त झाल्याने याठिकाणी उत्पादन होत असलेल्या भात बियाणांचे उत्पादन यावर्षी झालेले नाही. यामुळे यावर्षी शेतकºयांना या केंद्रातून भात बियाणे उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे.
साडेसात एकर परिसरात पसरलेल्या तालुका बीज गुणन केंद्रात भात बियाणांचे उत्पादन, शेतकरी मार्गदर्शन केंद्र, गांडूळ खतनिर्मिती, फळबाग इत्यादी घटकांचा समावेश आहे. याठिकाणी प्रतिवर्षी जवळपास १३५ ते १४० क्विंटल भात बियाणे निर्मिती केली जात होती.
स्थानिक शेतकºयांच्या मागणीनुसार किंवा बाजारात मागणी असलेले भात बियाणे याठिकाणी उत्पादन करून शेतकºयांना सवलतीने हे भात बियाणे पुरवठा केले जात होते. या माध्यमातून केंद्राला अंदाजे पाच लाख रु पये प्राप्त होत होते.
बियाणांच्या उत्पादनाकरिता लागणाºया सामग्रीसाठी निधीची आवश्यकता असते, मात्र गेली दोन वर्षे निधी न मिळाल्याने यावर्षी भात बियाणे उत्पादन झाले नाही. महाडमध्ये असलेल्या बीज गुणन केंद्रावर उत्पादित केले जाणारे कर्जत २ आणि कर्जत ६ या भात बियाणांना मोठी मागणी आहे. याठिकाणी उत्तम दर्जाच्या बियाण्यांची निर्मिती झाल्यास उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होईल.
केंद्र वाहतुकीस अडचणीचे
महाड तालुका बीज गुणन केंद्र हे महाडपासून सुमारे चार किमी अंतरावर आहे. मात्र हे केंद्र महामार्ग आणि महाडपासून आडमार्गावर असल्याने शेतकºयांना याठिकाणी जाण्या-येण्याकरिता वाहनांची सुविधा नाही. वयोवृद्ध शेतकरी या केंद्रापर्यंत जात नाहीत.
काळाच्या ओघात या बीज गुणन केंद्राकडे शासनाचे दुर्लक्ष होत गेले आहे. यामुळे भविष्यात या बीज गुणन केंद्रांची अवस्था बिकट होत चालली आहे.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या काळात हरितक्रांतीची सुरवात झाली आणि शेतकºयांना कृषी क्षेत्रातील सुधारित बियाणांची आणि शिक्षणाची गरज लक्षात घेवून या केंद्रांची निर्मिती झाली.
मात्र, आधुनिक काळात बियाणे तयार करणाºया अनेक कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. भविष्यात बीज गुणन केंद्रात भात बियाणे उपलब्ध झाले नाही तर खासगी कंपन्यांच्या उपलब्धतेवर शेतकºयांना निर्भर राहावे लागेल.
याठिकाणी गेली दोन वर्षे निधी प्राप्त झालेला नाही यामुळे खर्च भागवणे अशक्य झाले आहे. यामुळे यावर्षी भात बियाणे निर्माण करता आले नाही. या बीज गुणन केंद्रातील अन्य उपक्र म सुरू असून भविष्यात याठिकाणी नर्सरी प्रस्ताव आहे.
- विष्णू साळवे, उपप्रादेशिक कृषी अधिकारी, महाड