कोलते-मोकाशी गावात धरण असूनही पाणीटंचाई; मात्र वॉटर पार्कला हजारो लीटर पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 11:47 PM2019-05-31T23:47:36+5:302019-05-31T23:48:01+5:30
सरपंचाने दिले तहसीलदारांना निवेदन; गावातून जाणाऱ्या जलवाहिन्या तोडण्याचा इशारा
मोहोपाडा : कलोते मोकाशी या गावातच लघु पाटबंधारे विभागाचे धरण आहे. धरणात मुबलक पाणी असले तरी ते परिसरातील वॉटर पार्कला दिले जात असल्याने गावाबरोबर ग्रामपंचायत हद्दीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
कमी पाऊस पडल्याने पाणीटंचाई सुरू झाली, असे सर्वत्र चित्र निर्माण झाले आहे, काही ठिकाणी योग्य प्रकारे नियोजन नसल्याने तीव्र पाणीटंचाई सुरू आहे. येथील वॉटर पार्कला पाणीपुरवठा करू नये, असा ठराव ग्रामपंचायत कलोतेपासून पंचायत समितीमध्येही करण्यात आला आहे. पाणीपुरवठा करणाºया जलवाहिन्या ज्या गावातून जातात, त्या ग्रामपंचायतींनीपाणीपुरवठा खंडित करावा, असा ठराव केला होता. मात्र, वरिष्ठ पातळीवर झालेल्या निर्णयामुळे गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. कलोते धरणाच्या पाझर पाण्यावर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पाणीपुरवठा योजना आहेत. मात्र, वॉटर पार्कला धरणातून पाणी उचलण्याची परवानगी आहे. आता पाणी न सोडल्याने नदी व नाले कोरडे पडू लागल्या आहेत. नदीला पाणी सोडल्यास वॉटर पार्कला वितरित होणाºया पाण्यावर परिणाम होणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप जाधव यांनी सांगितले. कलोते रयती या गावात पाणीच जात नसल्याने तिथे ग्रुप ग्रामपंचायत कलोते मार्फत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे ग्रामविकास अधिकारी गिरासे यांनी सांगितले. या धरणाच्या पाण्यावर पाच योजना अवलंबून आहेत. या बाबत शुक्रवारी ग्रामपंचायतच्या सरपंच रेश्मा ठोंबरे यांनी उपसरपंच गणेश पवार, सर्व सदस्य यांच्यासह तहसीलदार इरेश चप्पलवार यांची भेट घेऊन वॉटर पार्कचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे पत्र दिले. ग्रामस्थांनी पाणीपुरवठा खंडित केल्यास त्याला जबाबदार ग्रामपंचायत नसणार, असे या वेळी नमूद करण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत कलोते यांनी पाणी सोडण्याबाबत विनंती पत्र दिल्यास पाणी सोडण्याबाबत कार्यवाही करू, अशी माहिती या वेळी सहायक अभियंता चव्हाण यांनी दिली.
वनवे ग्रामस्थांच्या श्रमदानातून विहिरीची स्वच्छता
राज्यातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. विहिरी आणि तलावांनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैलांची पायपीट करावी लागत आहे. खालापूर तालुक्यातील वनवे गावातही पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. विहिरीने तळ गाठल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
गावातील नागरिकांनी ‘जल है तो कल है’ या जनजागृती करणाºया संदेशातून बोध घेत मुख्य विहिरीची साफसफाईसाठी केली. सरकारी निधीची वाट न पहाता गावातील महिला आणि पुरुषांनी एकत्र येत श्रमदानातून गावातील पाण्याचा मुख्यस्रोत असणाºया विहिरीतून गाळ, कचरा काढून स्वच्छता केली.गावातील पुरुषांनी विहिरीत उतरून संपूर्ण गाळ काढला, तर महिलांनी विहीर परिसरातील झाडीझुडपे साफ केली.