- आविष्कार देसाईअलिबाग - एमआयडीसीची कोणतीच पाइपलाइन फुटलेली नाही, अथवा त्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे कामही सुरू नाही. पाटबंधारे विभागाने कुंडलिका नदीमधील पाणी न सोडल्यामुळे एमआयडीसीमार्फत होणारा पाणीपुरवठा सलग दोन दिवस होऊ शकला नाही.रविवारी पाटबंधारे विभागाने दुपारी पाणी सोडल्याचे सांगितल्याने नागरिकांना पाण्याची अडचण भासणार नाही, असे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आर.पी.पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.ऐन दिवाळीच्या तोंडावर अलिबाग शहराला होणारा पाणीपुरवठा शनिवारी सायंकाळी आणि रविवारी सकाळी बंद झाल्याने नागरिकांचे पाण्यावाचून प्रचंड हाल झाले. पाण्यासाठी नागरिकांची चांगलीच फरफट झाल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर होता.नागोठणे येथे एमआयडीसीची पाइपलाइन फुटली आहे. त्या पाइपचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर शहराला पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होणार असल्याचे काही चुकीचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रविवारी वसुबारसने दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे; परंतु शनिवारी सायंकाळपासून कोणतीच सूचना न देता पाणीपुरवठा खंडित झाला.त्यामुळे रविवारी सकाळी तरी पाणी येईल असे वाटले होते. मात्र, रविवारी सकाळीही पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांचे पाण्यावाचून प्रचंड हाल झाले. काही ठिकाणी विहिरी आहेत त्यातील पाण्याचा वापर नागरिकांनी केला; परंतु पिण्यासाठी पाणी संपत आल्याने नागरिक चांगलेच हवालदिल झाले होते. याबाबत एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आर.पी.पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, पावसाळ््यामध्ये अंबा नदीचे पाणी हे गुरुत्वीय बलाने एमआयडीसीच्या कॅनेलमध्ये येते. आता पावसाळा संपल्यामुळे कुंडलिका नदीमधील पाणी एमआयडीसीच्या कॅनेलमध्ये येणे गरजेचे होते; परंतु पाटबंधारे विभागाने कुंडलिका नदीचे पाणी एमआयडीसीच्या कॅनेलमध्ये न सोडल्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवले, अशी माहिती पाटील यांनी दिली.एमआयडीसीची पाइपलाइन फुटल्यामुळे पाण्याचा पुरवठा झाला नाही हे चुकीचे आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. कॅनेल भरण्यासाठी काही अवधी लागणार आहे. त्यामुळे नगर पालिकेने रविवारी सायंकाळी पाणीपुरवठा सुरू केल्यास तो कमी दाबाने होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.ऐन दिवाळीत नागरिकांचे पाण्यावाचून हालअलिबाग नगर पालिकेतील पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता, पाणी कमी झाल्याचे सांगण्यात आलेत्यामुळे शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. रविवारी सायंकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असेही स्पष्ट केले.दरम्यान, पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
पाटबंधारे विभागाने कुंडलिकेचे पाणी न सोडल्याने टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 3:21 AM