साकवाचे काम न झाल्याने गावांचा संपर्क तुटण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:19 AM2019-06-19T00:19:59+5:302019-06-19T00:20:29+5:30
स्ता सुधारणा कामात दिरंगाई झाल्याने पावसाळ्यात घूम आणि रुद्रवट गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.
म्हसळा : म्हसळा तालुक्यातील घूम, रुद्रवट या दोन गावांंसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून नवीन रस्त्याचे कामाला एका कोटीच्या निधीची मंजुरी मिळाली आहे. रस्ता विकास कामाचा ठेका एका ठेकेदाराला देऊन अन्य एका ठेकेदाराकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र, रस्ता सुधारणा कामात दिरंगाई झाल्याने पावसाळ्यात घूम आणि रुद्रवट गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.
गावाला जोडणाऱ्या मुख्य साकवाचे बांधकाम धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात घूम येथील नदीपात्राचे पाणी वाढले तर दोन्ही गावांचा रहदारीचा मुख्य मार्गच बंद होईल आणि घूम, रुद्रवट गावांचा म्हसळा तालुका आणि शहरातील संपर्क तुटेल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
ठेकेदाराने रस्त्याचे अन्य कोणतेही काम न करता जुने साकव तोडून नवीन कामाला सुरुवात केली. पण पाऊस सुरू होऊन सुद्धा साकवाचे काम पूर्ण झाले नाही त्यामुळे वरील दोन गावातील लोकांना रहदारीचा दुसरा कोणताच मार्ग नसल्याने त्यांचा तालुक्याशी संपर्क तुटणार आहे. याप्रकरणी सर्वस्वी ठेकेदार जबाबदार असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी माजी उपसभापती मधुकर गायकर यांनी खासदार सुनील तटकरे यांचेकडे कैफियत मांडून केली आहे तर लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनाही कळविले आहे.