दियाच्या हत्येप्रकरणी गावातील तरुणाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 02:49 AM2018-06-02T02:49:38+5:302018-06-02T02:49:38+5:30
माणगाव तालुक्यातील वावे येथील आठ वर्षीय बालिका दिया जाईलकर हिच्या निर्घृण खून प्रकरणातील पहिल्या आरोपीला माणगाव पोलिसांनी अटक केली आहे
माणगाव : माणगाव तालुक्यातील वावे येथील आठ वर्षीय बालिका दिया जाईलकर हिच्या निर्घृण खून प्रकरणातील पहिल्या आरोपीला माणगाव पोलिसांनी अटक केली आहे. गावातील २२ वर्षीय नराधम तरु णाने हे कृत्य केल्याचे उघड झाले असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
येत्या दोन दिवसांत इतर आरोपींना पकडण्यात येईल, असा विश्वास माणगाव पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. वावे येथील दिया जयेंद्र जाईलकर ही २५ मे रोजी बेपत्ता झाली होती. बेपत्ता झाल्यानंतर २८ मे रोजी चार दिवसांनी तिचा मृतदेह घरापासून जवळच असलेल्या पडक्या घरात कुजलेल्या स्थितीत सापडला. दियाच्या हत्येमुळे माणगाव तालुक्यातील संतापाचे वातावरण होते. दियाला न्याय मिळवून देण्यासाठी ठिकठिकाणी कडकडीत बंद, मूक मोर्चे काढून व आरोपीचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला होता.
दियाच्या बेपत्ता प्रकरणी पोलिसांनी दहा ते बारा संशयितांची धरपकड करीत चौकशी केली. चौथ्या दिवशी वावे येथील सूरज सहदेव करकरे (२२) या तरु णाला पोलिसांनी अटक केली. त्याने दियाची हत्या केल्याची कबुली जबाब पोलिसांना दिला आहे. मात्र हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अजूनही पाच ते सात संशयितांची चौकशी सुरू असून लवकरच सर्व आरोपी जेरबंद होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.