निसर्गाच्या अवकृपेमुळे भात उत्पादनात २० टक्के घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 12:36 AM2018-10-12T00:36:07+5:302018-10-12T00:36:18+5:30
रायगड जिल्ह्यातील भात पिकाच्या कापणीला सुरुवात झाली आहे. अलिबाग तालुक्यातील खंडाळे विभागातील शेतकऱ्यांनी घटस्थापनेच्या दुस-याच दिवशी आपल्या शिवारातील भात कापणीचा मुहूर्त साधला आहे.
- आविष्कार देसाई
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील भात पिकाच्या कापणीला सुरुवात झाली आहे. अलिबाग तालुक्यातील खंडाळे विभागातील शेतकऱ्यांनी घटस्थापनेच्या दुस-याच दिवशी आपल्या शिवारातील भात कापणीचा मुहूर्त साधला आहे.
काही दिवसांपूर्वी वादळी वाºयाने तडाखा दिल्याने जिल्ह्यातील भातासह आंबा बागायतदारांचे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे या वर्षी भाताच्या उत्पादनात सुमारे २० टक्क्यांनी घट होणार आहे. त्यामुळे भाताचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आता धूसर झाली आहे.
रायगड जिल्हा हा भाताचे कोठार होता. जिल्ह्यातील भाताचे क्षेत्र हे सुमारे एक लाख १० हजार हेक्टर आहे, त्यामुळे शेतातून भाताचे चांगले उत्पादन अपेक्षित असते. जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतीतील भात हे मोठ्या प्रमाणात स्वत:साठी वापरतो. अतिशय कमी प्रमाणातील शेतकरी आपले भात व्यापाºयांना विकतात.
काही दिवसांपूर्वी वादळी वाºयासह पडलेल्या पावसाने जिल्ह्यात हाहाकार उडवला होता. जिल्ह्यातील दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील भाताचे पीक आडवे झाले होते, तर तब्बल चार हजार आंब्याच्या झाडांना धोका पोहोचल्याने शेतकºयांचे सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला होता. कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीमुळे शेतकरी मात्र चांगलाच हवालदिल झाला आहे.
साधारणत: जून महिन्यात मेहनतीने लावलेल्या भाताचे उत्पादन घेण्याची वेळ शेतकºयांसाठी आता उजाडलेली आहे. अलिबाग तालुक्यातील खंडोळ, पवेळ या ग्रामीण भागातील शेतकºयांनी आपापल्या शिवारातील भात कापणीला सुरुवात केली आहे. नवरात्रोत्सवात बुधवारी घटस्थापना झाल्याच्या लगेचच दुसºया दिवशी भात कापणीला सुरुवात करण्यात आली आहे. शेतीची कामे करण्यासाठी याआधी एकमेकांच्या शेतात जाऊन त्यांना मदत केली जायची. सध्या शिकलेले तरुण शेतीपासून दूर जात असल्याने शेतात काम करण्याचा तुटवडा भासत आहे. त्याचबरोबर शेतात काम करणाºयांची मजुरीदेखील वाढली असल्याने उत्पन्नापेक्षा खर्च अधिक वाढला आहे. त्यातच निसर्गाची अधूनमधून अवकृपा होत असल्याने शेतीचे नुकसान होऊन त्याचा आर्थिक फटका हा शेतकºयांना बसत आहे, त्यामुळेच शेतकºयांसाठी शेतीचा व्यवसाय हा आतबट्ट्यांचा झाला आहे.
दरम्यान, या वर्षी भाताच्या उत्पादनामध्ये २० टक्क्यांनी घट होणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पुरेसा पाऊस न झाल्याने नुकसान
सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भाताचे पीक तयार होणे अपेक्षित होते. मात्र, पुरेसा पाऊस न मिळाल्याने काही प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे. ज्यांच्या शेतातमध्ये भाताचे पीक आले होते; परंतु ढगाळ वातावरणामुळे पीक काढण्याची हिंमत शेतकरी करू शकले नाहीत. समजा त्यांनी पीक काढले असते आणि अचानक पाऊस आला असता, तर शेतात काढून ठेवलेले भाताचे पीक भिजून शेतकरी आर्थिक खाईत लोटला असता.
आॅक्टोबर हिटचे चटके मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत, त्यामुळे शेतकºयांसह मजुरांना शेतात काम करणे मुश्कील झाले आहे. यावर उपाय म्हणून सकाळी ८ ते ११ आणि दुपारी ३ ते ६ या कालावधीत शेतीची कामे करण्यात येत आहेत. याआधी सकाळी १० ते १ तर दुपारी ३ ते ६ अशी शेतीच्या कामाची वेळ होती. आता त्यामध्ये सोयीस्कर बदल करण्यात आला असल्याची माहिती शेतकरी नंदू सोडवे यांनी दिली.