नवरात्रोत्सवामुळे झेंडूच्या फुलांना मागणी, झेंडू, शेवंती २०० रुपये किलो
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 03:01 AM2019-10-03T03:01:46+5:302019-10-03T03:04:27+5:30
रोहा शहारात नवरात्रोत्सवानिमित्त झेंडूच्या व शेवंतीच्या फुलांनी बाजारपेठा फुलल्या आहेत. यंदा या फुलांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
- मिलिंद अष्टिवकर
रोहा : रोहा शहारात नवरात्रोत्सवानिमित्त झेंडूच्या व शेवंतीच्या फुलांनी बाजारपेठा फुलल्या आहेत. यंदा या फुलांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे भक्तगणांच्या खिशाला कात्री लागत आहे. नवरात्री आणि दसरा या धार्मिक उत्सवात फुलांच्या किमतींनी सीमोल्लंघन केल्याने फुले खरेदी करताना भाविकांचा काहीसा हिरमोड होत आहे.
नवरात्री उत्सवात झेंडू आणि शेवंतीच्या फुलांना मोठी मागणी असते, त्याप्रमाणे रोहा शहरासह तालुक्यातील बाजारपेठा झेंडूच्या फुलांनी बहरल्या आहेत. तालुक्यातील मंदिर देवस्थान, सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळे यासह साडेतीन शक्तिपीठे, ग्रामदैवत, गावदेवांची घटस्थापना केली जाते. त्यांच्यासह घरोघरी देवघटी बसलेले कुळदेव आदीचे पूजन केले जाते. या दिवसांत उपवास, नवस करून देवीला साकडे घातले जाते. अनेक वेळा आपले घरच्या देवांचीही घटी बसवली जाते. यात देवाला आवडणाऱ्या फुलांचे हार, देवीला शेवंतीच्या फुलांच्या वेण्या व देवाच्या मुख्य गाभाºयात व प्रवेशद्वाराजवळ फुलांची सजावट लोक करत असतात. यासाठी फुले खरेदीवर श्रद्धेपोटी मोठा खर्च केला जातो. त्यामुळे या दिवसांत झेंडू व शेवंती फुलांच्या मागणीत वाढ होते. यंदा मात्र पिवळा व लाल झेंडू २०० रुपये, पिवळी व पांढरी शेवंतीच्या फुलांची किंमत किलोमागे २०० रुपये इतकी झाली आहे.
गेल्या वर्षी नवरात्रोत्सवात फुलांच्या किमती ५० टक्क्यांनी कमी होत्या. फुलांना एवढा भाव गणपती उत्सवातही नव्हता. झेंडू व अन्य फुलांच्या किमतीत भाव वाढल्याने नागरिकांना नाइलाजास्तव फुले खरेदी करावी लागत आहेत. तर या वर्षी किमती कधी नव्हे त्या गगनाला भिडल्याने भक्तगणांचा मोठा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.
बाजारात या वर्षी फुलांची आवक कमी आहे, यामुळे आमची खरेदीच १६० रुपये किलोने होत असल्याने २०० रु. किलोने नाइलाजास्तव विक्री करावी लागत आहे. गेल्या वर्षी ८० ते १०० रुपये प्रती किलो इतका भाव होता, तसेच मालाची आवक मोठी होती. - प्रतिक मोहिते, फूलेविक्रेता