अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये रस्ता सुरक्षा पंधरवडा सुरु आहे. याकालावधीत अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा, रायगड जिल्हा पोलिसांच्या वाहतूक विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे यांनी केला. सोमवारी २३ जानेवारीला या अभियानाची सांगता होत आहे.या कालावधीत जिल्ह्यामध्ये वाहतुकीचे नियम पाळणे, अपघात रोखणे यासाठी विविध, शिबीरे, जनजागृती रॅली काढण्यात आल्या होत्या. काही शाळा, कंपन्यांमध्ये पॉवर पार्इंट प्रेझेंटेशन दाखविण्यात आले. त्यांला चांगला प्रतिसाद लाभल्याचे म्हात्रे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. अभियानात नागरिकांसह सामाजिक संस्थांचा उर्स्फूतपणे सहभाग मिळत नसल्याची खंतही म्हात्रे यांनी व्यक्त केली. २०१५ ते २२ जानेवारी २०१७ या कालावधीत वाहतूक विभागाने १०६ शाळांमध्ये वाहतुकी संदर्भात उपक्रम राबवले आहेत. डिसेंबर २०१६ पर्यंत डंक अॅण्ड ड्राईव्हच्या ४०० केसेस करण्यात आल्या आहेत. ९ जानेवारी ते २३ जानेवीरी २०१७ या कालावधीत सर्वत्र रस्ता सुरक्षा पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. या कालावधीत अपघातांच्या संख्येत घट झाली आहे. अभियान सुरु होण्याआधी दररोज अपघातात एकाचा तरी मृत्यू होत होता, असेही म्हात्रे यांनी सांगितले. युवकांनी अशा राष्ट्रहीताच्या अभियानामध्ये मोठ्या संख्येने सामिल होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे विविध सामाजिक संस्था, जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रानेही यामध्ये सहभागी होणे गरजेचे असल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.दरम्यान, वाहतुक पंधरवड्या निमीत्ताने आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आली होती. पीयुसी सेंटर यांचीही ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद लाभला होता.
रस्ता सुरक्षा अभियानात अपघाताच्या संख्येत घट
By admin | Published: January 23, 2017 5:46 AM