नामदेव मोरे
नवी मुंबई : जेएनपीटी राष्ट्रीय महामार्ग उरणवासीयांसाठी डोकेदुखी बनला आहे. खड्डे, अवैध पार्किंग, अपघात व रोजच्या वाहतूककोंडीमुळे तीन लाख नागरिकांना वेठीस धरले जात आहे. महामार्गाचे काँक्रीटीकरण व दुरुस्तीची कामे धीम्या गतीने सुरू असून नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक झाल्यानंतरच शासकीय यंत्रणा जागी होणार का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
देशातील प्रमुख बंदरामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचा समावेश होतो. १९८९ मध्ये सुरू झालेल्या जेएनपीटी बंदरामधून वर्षाला ५० लाख कंटेनर हाताळणीचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. बंदर व परिसरातून वर्षाला १ हजार कोटीपेक्षा जास्त उलाढाल होत आहे. रोज २० हजार अवजड वाहनांची या परिसरात ये - जा असल्यामुळे शासनाने ३४८ हा २८ किलोमीटरचा व ३४८ ए हा १७ किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आला आहे. उरण फाटा ते जेएनपीटी व पनवेल ते जेएनपीटी या दोन्ही मार्गाच्या रुंदीकरणाचे व काँक्रीटीकरणाचे कामही सुरू झाले आहे, परंतु धीम्या गतीने सुरू असलेले काम व शासकीय यंत्रणांच्या नियोजनशून्य कारभारामुळे या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पामबीच रोडवर किल्ले गावठाण परिसरामध्ये रोज वाहतूककोंडी होत आहे. विमानतळाची पाटी लावलेल्या ठिकाणीही स्थिती बिकट झाली आहे. या मार्गावरील जासई हे महत्त्वाचे ठिकाण असून जासई नाक्यावर रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे मोटारसायकल व इतर वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघात होऊ लागले आहेत. वाहने खड्ड्यांमध्ये आदळून त्यांचे नुकसान होत आहे. ओवळा येथेही खड्ड्यांचे प्रमाण जास्त असून वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागला आहे.
महामार्गावर सर्वात गंभीर स्थिती करळ फाटा येथे झाली आहे. येथील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूच्या मार्गिकेवर प्रचंड खड्डे पडले आहेत. वाहतूककोंडीमुळे पुलावरील दोन मिनिटाचे अंतर पूर्ण करायला पंधरा ते वीस मिनिटे वेळ लागत आहे. उरण शहरात जाण्याच्या मार्गावरही प्रचंड खड्डे पडले आहेत. महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी कामे पूर्ण झाली असली तरी रोडच्या मध्येच बांधकाम व इतर साहित्य ठेवल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रोडच्या दोन्ही बाजूला ट्रेलर उभे केले जात आहेत. काही ठिकाणी दोन लेनमध्ये ट्रेलर उभे केल्यामुळे वाहतूक ठप्प होत आहे. नवी मुंबई व पनवेलवरून उरणला जाण्यासाठी सकाळी व सायंकाळी एक ते दीड तासाचा अवधी लागत आहे. तीन लाखपेक्षा जास्त उरणकर वर्षानुवर्षे होणाऱ्या कोंडीमुळे त्रस्त असून अजून किती वर्षे त्रास सहन करायचा, असा प्रश्न उपस्थित करत आहेत. अशीच स्थिती राहिली नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक होईल, असा इशाराही प्रवासी देत आहेत. (अधिक छायाचित्र/४)उपचाराची सोय नाही२०१७ मध्ये जेएनपीटी महामार्गावर अपघातामध्ये ३३ नागरिकांचा मृत्यू झाला. ३९ गंभीर अपघात झाल्याची नोंद आहे. किरकोळ अपघातांची संख्या असंख्य आहे. या रोडवर अपघात झाल्यास जखमींना उपचारासाठी जवळ रुग्णालयच नाही. नवी मुंबई महानगरपालिका किंवा मुंबईमध्ये उपचारासाठी घेऊन जावे लागत आहे.सर्व्हिस रोड नाहीचजेएनपीटी महामार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. अपघात झाल्यानंतर किंवा इतर कारणांनी वाहतूककोंडी झाली की सर्वांनाच एक ते दोन तास रोडमध्ये अडकून राहावे लागत आहे. राष्ट्रीय महामार्गाला समांतर सर्व्हिस रोडच बनविण्यात आलेला नाही.अवजड वाहनांना बंदीअवजड वाहनांमुळे या मार्गावरील वाहतूककोंडी वाढत आहे. यामुळे सायंकाळी ५ ते रात्री १0 दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. यामुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळत असला तरी जोपर्यंत अवैध पार्किंग, खड्डे, रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत चक्काजामची स्थिती कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.महामार्गाचे वाहनतळात रूपांतरराष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूला ट्रेलर उभे केले जात आहेत. गतवर्षी पोलिसांनी ४,८४८ एवढ्या वाहनांवर कारवाई केली होती, परंतु रोडवर उभ्या राहणाºया वाहनांचे प्रमाण पाहिले तर एवढी कारवाई एक महिन्यामध्ये झाली पाहिजे. अवजड वाहनांमुळे महामार्गावरील समस्या गंभीर होत चालली आहे.जेएनपीटी महामार्गाच्या दुरवस्थेविषयी आम्ही जनहित याचिका दाखल केली आहे. महामार्गावरील खड्डे, अवैध पार्किंग, अपघात व इतर समस्या न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.- सुधाकर पाटील,अध्यक्ष, उरण सामाजिक संस्था