कार्लेखिंड : मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास दिवसेंदिवस त्रासदायक आणि धोकादायक ठरत आहे. महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामामुळे नाहक जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावर अक्षरश: खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून भरण्यात आलेले खड्डे पुन्हा तयार होत आहे. तेथे टाकण्यात आलेली माती आणि खडी पुन्हा खड्ड्यांच्यावर आल्यामुळे रस्ता खाली, वर झाला आहे. त्यामुळे वाहनांची गती मुंगीच्या चालीसारखी झाली आहे. दररोज या महामार्गावरु न लाखो वाहने प्रवास करतात,यामुळे सकाळपासून वाहतूक कोंडी होत असते. खड्डे असल्यामुळे एखादे अवजड वाहन बंद पडते, हे प्रकार आता नित्याचाच झाला आहे. यामुळे कर्मचारीवर्ग, शाळा, कॉलेजातील विद्यार्थी तसेच याच मार्गावरून दर दहा मिनिटांनी जाणारी रुग्णवाहिका अडकून राहते हे आता नित्याचे होत आहे. त्यामुळे हा प्रवास त्रासदायक ठरत आहे. ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्या ठिकाणी ठोकळे लावण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सुद्धा वाहतूक कोंडी होत आहे. मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी वाहकाला कसरत करावी लागत आहे. त्यामध्ये काहीना काही अपघातांची मालिका सुरु आहे. वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्याकरिता वाहतूक पोलिसांवर ताण पडत आहे. या महामार्गाच्या दयनीय अवस्थेमुळे अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून येत आहे. अख्ख्या उन्हाळ्यात या मार्गावर कोणत्याही प्रकारचे काम करण्यात न आल्यामुळे यावर्षी जास्त त्रास सहन करावा लागला आहे. सध्याच्या परिस्थितीला होणारा खर्च हा उन्हाळ्यात करु न मार्ग सुस्थितीत केला असता तर त्यापेक्षा खर्च कमी झाला असता असा सूर जनतेतून उमटत आहे. गणेशोत्सव काळात काय होईल याचा विचार करुन कोकणवासीय त्रस्त होत आहेत. बुधवारी परिवहन मंत्री यांनी २५ आॅगस्टपर्यंत महामार्गावरील खड्डे भरण्याचे सुचविले आहे. (वार्ताहर)
खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
By admin | Published: August 13, 2016 4:02 AM