- सिकंदर अनवारेदासगाव - रायगड किल्ल्याच्या संवर्धनाकरिता शासनाने भरघोस निधी मंजूर केला असून, या संवर्धनाच्या कामामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार प्राप्त झाला आहे. विविध कामांसाठी लागणारे मजूर रायगड किल्ला परिसरातील गावातलेच घेतले जात असल्याने या ग्रामस्थांना एक आधार निर्माण झाला आहे. संवर्धनाच्या कामाला लागणारा दगडही याच परिसरातून घेतला जात आहे.शासनाने रायगडच्या संवर्धनाकरिता विशेष मोहीम हातात घेऊन याकरिता जवळपास ६०० कोटी रुपये मंजूर केले. यातील ५९ कोटी विविध कामांसाठी वर्गदेखील झाले. पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली शास्त्रीय पद्धतीतून ही कामे सुरू करण्यात आली आहेत. गडावरील पिण्याचे पाण्याचे स्रोत सुधारणे, दुरुस्ती करणे, ऐतिहासिक वास्तूंची रासायनिक पद्धतीने साफसफाई करणे, गडावर जाण्याकरिता असणारा पायरी मार्ग दुरुस्त करणे आदी कामे हाती घेण्यात आली आहेत, याकरिता लागणारा बेसॉल्ट जातीचा दगड रायगड परिसरात उपलब्ध आहे. हा दगड रायगडच्या कामाशी मिळता जुळता असल्याने स्थानिक पातळीवर हा दगड गोळा केला जात असल्याचे रायगड प्राधिकरणाचे वरुण भामरे यांनी सांगितले. रायगड परिसरातील दगडाची तपासणी करण्यात आली असता हा दगड या कामाकरिता योग्य असल्याचे दिसून आले आहे. यामुळे किल्ले रायगड परिसरातील गावांतूनच हा दगड गोळा केला जात आहे. स्थानिकांना त्याचा मोबदला आणि वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीला चालना मिळाली आहे. रायगड किल्ला संवर्धनाकरिता मोठ्या प्रमाणावर लागणारा दगड हा पाचाड, हिरकणीवाडी, नेवाळी, वाळसुरे, या गावांबरोबरच महाड-रायगड रस्त्याकडेला असलेल्या गावांमधून गोळा केला जात आहे. शिवाय, स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून बांधकाम सामान किल्ल्यावर नेले जात आहे. सध्या या परिसरातील जवळपास ८० जण मजुरीवर काम करत आहेत. प्रत्येक कामगाराला प्रतिदिवस ५०० ते ३३० रुपये मजुरी दिली जात आहे. पायरी मार्गाला १० ते १२ हजार दगड आणि गडावरील बांधकामाला ९ हजार दगडांची गरज आहे. सध्या गडावर चार ते साडेचार दगड होळीच्या माळावर नेण्यात आले आहेत. चित्त दरवाजा ते हत्ती तलावापर्यंत दगडी पायऱ्या केल्या जात असून, यावर टेक्चर कोरण्यात येणार आहे.रायगडावर बांधकाम साहित्य नेण्याकरिता रायगड रोपवेचा वापर होऊ शकला असता. मात्र, रायगड रोपवेच्या माध्यमातून सामान नेणे कमी वेळेत शक्य असले तरी महागडे ठरत आहे. यामुळे रेती, लागणारा दगड, अशा प्रकारचे बांधकाम साहित्य पायºयांवरून नेण्याकरिता माणसांची गरज आहे. हे मनुष्यबळ स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमातून घेतले जात आहे. याकरिता नेमण्यात आलेल्या ठेकेदारांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थांनाच या कामावर घेतले जावे आणि त्यांनाच रोजगार प्राप्त करून देण्यात यावा, अशी माहिती युवराज संभाजीराजे यांनी दिली आहे.रायगड संवर्धनाच्या कामात अधिकाधिक पारदर्शकता निर्माण करून भ्रष्टाचार विरहित काम केले जाणार आहे. रायगड संवर्धन प्राधिकरणाच्या माध्यमातून केल्या जाणा-या कामात स्थानिक ग्रामस्थांचा मोलाचा सहभाग राहणार आहे. त्यांना या कामातून कशा प्रकारे रोजगार प्राप्त होईल हे पाहिले जाणार आहे.- युवराज संभाजी राजे,अध्यक्ष, रायगड प्राधिकरण
रायगड संवर्धनामुळे स्थानिकांना रोजगार , पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली सुरू आहे किल्ल्याचे काम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 3:21 AM