मिलिंद अष्टीवकर रोहा : तालुक्यातील पेपरमिल ते धानकान्हे हा १२.२५० कि.मी. चा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला होता. २०१८ मध्ये पेपरमिल ते देवकान्हे हा ११ किमीपर्यंतचा रस्ता पूर्ण करण्यात आला होता. मात्र हा रस्ता पेपरमिल ते देवकान्हेपर्यंत पहिल्याच पावसात साइडपट्टी वाहून गेल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. या मार्गावरील वांदेलीच्या हद्दीतील रस्त्याच्या बाजूच्या साइडपट्टी वळणावर वाहून गेल्या आहेत. याशिवाय ठिकठिकाणी साइडपट्टीचा अभाव असल्याने व कालव्याच्या उंचीनुसार रस्त्याची उंची नसल्याने त्रासदायक ठरत आहे.या मार्गावरील पेपरमिल ते देवकान्हे या ११ किमी अंतरावरील काम पूर्ण झाले आहे. मात्र ३ मीटरचा रस्ता आणि दोन्ही बाजूला १.५० मीटर साइडपट्टी असणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही असे स्पष्ट ठिकठिकाणी असलेल्या साइडपट्टीवरुन दिसत आहे. आता या मार्गावरील रस्ता हा खराब झालेला आहे. साइडपट्ट्या वाहून गेल्या आहेत. कारपेटला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी करणे आवश्यक आहे अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.याच रस्त्याचा पुढील भाग असलेला देवकान्हे ते धानकान्हे हा १.२५० किमीचा रस्ता रखडला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने सर्व्हे केल्याप्रमाणे रस्ता मंजूर झाला होता. या रस्त्याची जागा अजून शेतकऱ्यांच्या नावावर असल्याने शेतकरी भूसंपादनाचे पैसे मागत आहेत. मात्र तशी तरतूद ही आपल्या बजेटमध्ये नसल्याने हा रस्ता रखडला आहे. रस्ता पूर्ण होण्यासाठी देवकान्हे ग्रुप ग्रामपंचायतीला शेतकऱ्यांची समजूत घालण्यासाठी पत्र दिले होते. मात्र ग्रामपंचायतीने शेतकरी तयार होत नाहीत असे स्पष्ट पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे आहे त्या स्थितीत रस्ता आमच्याकडून पूर्ण होणार नाही, असे जिल्हा परिषद शाखा अभियंता आनंद गोरे यांनी सांगितले.>रस्त्यांच्या कामाबाबत नागरिकांना शंकामुख्य रस्त्यावरुन सोनगाव, मालसई, कारिवणे, हार्डी, हाल, कवळठे, तळवडा आदिवासीवाडी चणेरा, डोलवहाल आणि तिसे हे रस्ते मुख्य रस्त्यापासून या गावांना जोडले जातात. या रस्त्यांची कोट्यवधीची मंजुरी जिल्हा नियोजन डेव्हलपमेंट कमिटीमधून झाली आहे. ही कामे तरी चांगली होतील ना असे स्थानिक नागरिकांतून विचारणा होत आहे.
पावसामुळे रस्त्याची साइडपट्टी गेली वाहून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 11:51 PM