पावसामुळे फुटला कर्जत तालुक्यातील उमरोली गावातील तलाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 11:41 PM2019-09-15T23:41:32+5:302019-09-15T23:41:41+5:30
कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीमधील उमरोली गावातील गाव तलाव सततच्या पावसाने फुटला आहे.
नेरळ : कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीमधील उमरोली गावातील गाव तलाव सततच्या पावसाने फुटला आहे. मे महिन्यात त्या तलावातील गाळ आणि माती सरपंच सुनीता बुंधाटे यांच्या पुढाकाराने काढण्यात आला होता. दरम्यान, गाव तलाव फुटल्याने त्यातील सर्व पाणी हे वाहून गेले आहे. त्यामुळे उमरोली गावातील जनावरांचे यावर्षी पिण्याच्या पाण्यासाठी हाल होणार आहेत.
कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यात असलेल्या उमरोली गावात जुना गाव तलाव आहे. त्या तलावात गेली अनेक वर्षे मोठ्या प्रमाणात गाळ साचून राहिला होता. तो गाळ काढण्याचे काम यावर्षी उन्हाळ्यात उमरोली ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता
बुंधाटे यांनी ग्रामनिधीमधून काढून घेतला होता. त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात पावसाचे पाणी साचून राहणार होते. त्यामुळे उमरोली ग्रामस्थ यावर्षी आनंदात होते. मात्र गेली काही दिवस सातत्याने पाऊस पडत असून तलाव ओसंडून वाहत होता.
१४ सप्टेंबर रोजी पहाटे त्या तलावाला भगदाड पडले आणि त्यातील सर्व पाणी हे तीन तासात वाहून गेले. त्यामुळे आता तलाव कोरडा पडला असून त्या तलावाकडे पाहून उमरोली ग्रामस्थ यांच्या डोळ्यात पाणी येत आहे.
उमरोली गावातील जनावरे आणि गुरे यांच्यासाठी ते पाणी उपयोगात यायचे. मात्र आता तलाव फुटून त्यातील सर्व पाणी वाहून गेल्याने उन्हाळ्यात जनावरे काय करतील? असा प्रश्न उभा राहिला आहे. यामुळे ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. पावसाळा सुरू आहे तोपर्यंत जनावरांसाठी पाण्याची अडचण भासणार नाही, मात्र उन्हाळ्यात कु ठण पाणी आणायची अशी चिंता ग्रामस्थांना सतावत आहे.