पावसाळा संपताच तलाव कोरडा, वनविभागाने चुकीच्या ठिकाणी बांधकाम केल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 02:50 AM2017-10-27T02:50:37+5:302017-10-27T02:51:03+5:30
नेरळ : वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी वन विभागातर्फे कर्जत तालुक्यातील सापेले येथे तलाव खोदण्यात आला.
कांता हाबळे
नेरळ : वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी वन विभागातर्फे कर्जत तालुक्यातील सापेले येथे तलाव खोदण्यात आला. मात्र, ज्या ठिकाणी तलाव खोदला आहे. तेथे नैसर्गिक पाण्याचे स्रोत नसल्याने हा तलाव पावसाळा संपताच कोरडा पडला आहे. वनविभागाने कोणतीही शहानिशा न करता, नियोजन न करता, तलावासाठी चुकीची जागा निवडली, असा आरोप परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.
कर्जत तालुक्यातील अनेक ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वनविभागाने जिल्हा नियोजन अंतर्गत पावसाळ्यापूर्वी लाखो रुपये खर्च करून वन तलाव बांधले; परंतु पावसाळा संपण्यापूर्वीच नद्या, ओढे वाहत असताना वन विभागाने सापेले येथे बांधलेले ३३ बाय ३३ मीटर्सचे वन तलाव अगदी कोरडे पडले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाबू घारे आणि ग्रामस्थ यांनी आक्रमक भूमिका घेत, वन अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमताने केलेल्या निकृष्ट कामामुळेच तलावाची दुरवस्था झाल्याचा आरोप करत या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
कर्जत तालुक्यातील तांबस या महसुली गावालगत असलेल्या सापेले गावाला लागून ६२ हेक्टर क्षेत्र हे वनविभागाचे आहे. वनविभागाने डोंगर उतारावर हा तलाव बांधला आहे. तर तलावाच्या खालच्या बाजूचे क्षेत्र उताराचे असून, राजनाल्याच्या क्षेत्राखाली जमिनी येत असल्याने जमीन बाराही महिने पाण्याखाली येतात. शिवाय राजनाल्याच्या खालच्या बाजूला वनविभागाच्या जमिनीचे क्षेत्र असूनही अधिकाºयांनी तलावासाठी ती जागा का निवडली नाही, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. या कामाची पाहणी शिवसेना विभागप्रमुख योगेश दाभाडे, कृष्णा जोशी, मनोज पवार, सुनील मसणे, बाजीराव दळवी, राजेश शेळके, अनिल जाधव यांनी केली.