महाड : महाड पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी मंगळवारी झालेल्या निवडी वेळी शिवसेनेच्या दोन गटांमध्ये झालेल्या राडेबाजीनंतर शिवसैनिकांनी केलेल्या मागणीनुसार सभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराला मतदान करणाऱ्या शिवसेनेच्या दोन पंचायत समिती सदस्यांनी आपले राजीनामे पक्षाकडे दिले असल्याची माहिती तालुकाप्रमुख सुरेश महाडिक यांनी दिली. वसंत बटावले आणि सुहेब पाचकर यांनी आपले राजीनामे दिल्याचे सांगण्यात आले.
सीताराम कदम यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी मंगळवारी निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेच्या सपना मालुसरे या अधिकृत उमेदवार असतानाही दत्ताराम फळसकर यांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरून बंडखोरी करीत मालुसरे यांना उघडपणे आव्हान देत, पक्षनेतृत्वाविरोधात दंड थोपटले. निर्विवाद बहुमत असतानाही या निवडणुकीत शिवसेनेच्या सपना मालुसरे यांना आश्चर्यकारक पराभवाची नामुश्की पत्करावी लागली. मालुसरे यांना त्यांच्यासह सीताराम कदम, सिद्धी खांबे, ममता गांगण अशी चार, तर बंडखोर दत्ताराम फळसकर यांना स्वत: सह सदानंद मांडवकर, सुहेब पाचकर, दीपिका शेलार, वसंत बटावले आणि काँग्रेसच्या एकमेव सदस्या अपर्णा येरुणकर अशी सहा मते मिळवून ते विजयी झाले होते. शिवसेनेच्या सपना मालुसरे यांच्या पराभवानंतर शिवसेनेच्या दोन गटांत धक्काबुक्की झाली होती. तर सहजपणे विजयाची खात्री असतानाही शिवसेनेचा झालेला पराभव निष्टावान शिवसैनिकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे त्यांनी त्वरित राजीनामे द्यावेत, ही मागणी जोर धरू लागली आहे.पक्षनेतृत्वाने जबाबदारी पार पाडली नाहीच्पक्षनेतृत्वाने सपना मालुसरे यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पक्षनेतृत्वाचीच होती. मात्र, त्यांनी ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही, त्यामुळे शिवसेनेच्या या पराभवाला पक्षनेतृत्वच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे कामगार नेते व सपना मालुसरे यांचे दीर साधुराम यांनी केला आहे.च्दरम्यान, आमदार भरत गोगावले हे महाडबाहेर असल्याने याबाबत आज कुठलीही चर्चा झाली नाही, या घडामोडींवर आमदार भरत गोगावले काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, दत्ताराम फळसकर यांना शिवसेनेतूनच पाठबळ मिळाल्यामुळेच फळसकर यांनी हे बंडखोरीचे धाडसी पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.