अलिबाग : दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुण्याकडून रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमध्ये गेल्या आठ दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील घाटमाथ्यावरील नागमोडी वळणे, अरुंद रस्त्यांचा फारसा परिचय नसलेल्या नवख्या चालकांमुळे परिसरात अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
अतिवेग, ओव्हरटेक करण्याच्या नादात गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या २१ वाहन अपघातांत तीन मृत्यू, तर ४८ जण जखमी झाले आहेत. वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून वाहने चालविल्यामुळे,चालक जिल्ह्यातील घाट रस्त्यावर वाहने चालविताना बावरल्याने अनेकदा अपघात होत असल्याचा निष्कर्ष पोलिसांचा आहे. वडखळ पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी मध्यरात्री मुंबईतील पवई येथून अलिबाग येथे कारचालक जात होता. या वेळी पाठीमागून येणाºया कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सार्थक कृष्णा खताळ (८) हा जखमी झाला आहे.सायन-पनवेल महामार्गावर रांगापनवेल : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी गेलेले प्रवासी रविवारी परतीच्या प्रवासाला लागले, त्यामुळे सायन-पनवेल महामार्गावर वाहनांच्या रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास लांबच लाब रांगा पाहावयास मिळाल्या. खारघर येथून कळंबोलीपर्यंत ही वाहतूककोंडी झाली होती. कोपरा उड्डाणपुलाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूककोंडीत आणखी भर पडली. त्यामुळे खारघर रेल्वेस्थानक गाठण्यासाठी तासाचा अवधी लागत होता.