अवकाळी पावसाने किडीची शक्यता, तुडतुडा व करपा रोगाची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 06:22 AM2017-12-10T06:22:58+5:302017-12-10T06:23:03+5:30
जिल्ह्यात १४ हजार हेक्टर क्षेत्रावर असलेली आंबा बागायत, १० हजार हेक्टर क्षेत्रावर असलेला काजू आणि ६ हजार हेक्टर क्षेत्रावर असलेल्या नारळ आणि आंतरपिकांतर्गत ४ हजार ५०० हेक्टरात सुपारी या पिकांवर गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ राहिलेले...
जयंत धुळप/ लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : जिल्ह्यात १४ हजार हेक्टर क्षेत्रावर असलेली आंबा बागायत, १० हजार हेक्टर क्षेत्रावर असलेला काजू आणि ६ हजार हेक्टर क्षेत्रावर असलेल्या नारळ आणि आंतरपिकांतर्गत ४ हजार ५०० हेक्टरात सुपारी या पिकांवर गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ राहिलेले वातावरण आणि गेल्या ४ डिसेंबर रोजी झालेला अवकाळी पाऊ स यामुळे विपरीत परिणामाची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. वातावरणातील वाढलेल्या आर्द्रतेमुळे तुडतुड्या कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून, करपा रोगाचीही शक्यता असल्याने आवश्यकत्या फवारण्या करून पिकांची काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
संपूर्ण कोकण विभागामध्ये आंबा, काजू आणि नारळ ही प्रमुख पिके असून, सद्यस्थितीत ही पिके वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आहेत. आंबा पीक विविध अवस्थेमध्ये असून, काही ठिकाणी फळे वाटाण्याच्या आकाराची झाली आहेत. काही बागांमध्ये मोहर फुटण्याच्या अवस्थेमध्ये असून बहुसंख्य बागांमध्ये पालवी पक्व होण्याच्या अवस्थेमध्ये आहे. वातावरणातील वाढलेल्या आर्द्रतेमुळे पालवी तसेच मोहोर अवस्थेत असलेल्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तुडतुडा व करपा यांच्या प्रादुर्भावामुळे फळांवर डाग येण्याची तसेच मोहोर करपण्याची शक्यता आहे. यावर तातडीची उपाययोजना कृषी विभागाने सुचविली आहे.
काजू पीक वाढीच्या विविध अवस्थेमध्ये असून, काही बागांमध्ये नवीन पालवी येण्यास सुरुवात झाली आहे तर काही ठिकाणी नवीन पालवीतून मोहोर येऊ न फळधारणेस सुरुवात झाली आहे. ढगाळ वातावरण तसेच पाऊ स पडल्यामुळे काजूवर ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यासाठी लॅमडा सायहेलोथ्रिन ५ टक्के प्रवाही ६ मिली किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही १० मिली यापैकी एक कीटकनाशक १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. त्याबरोबर बागेमधील गवत काढून बाग त्वरित स्वच्छ करणे आवश्यक आहे. त्यामुळे बागेतील आर्द्रता कमी होण्यास मदत होईल.
किनापट्टीवरील भागात वादळामुळे नारळ आणि सुपारीची झाडे उन्मळून पडली असतील तर अशा झाडांची त्वरित विल्हेवाट लावावी. मेलेल्या झाडांची खोडे बागेत तशीच पडून राहिल्यास त्यामध्ये सोंड्या भुंगा आणि गेंड्या भुंगा या किडी आणि खोडावर वाढणाºया अळंबीची उत्पत्ती होऊ शकते. ती कालांतराने नारळ व सुपारी बागेचे नुकसान करू शकते. तसेच नारळावर कोंब कुजणे या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी नारळाच्या कोंबात कॉपर आॅक्सिक्लोराईड ५० टक्के प्रवाही २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण ओतावे, अशी उपाययोजना कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी सुचविली आहे.
कृषी विभागाने सुचवलेली उपाययोजना
१पाऊ स थांबल्यावर लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ०६ मिली किंवा इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के प्रवाही ३ मिली यापैकी एक कीटकनाशक १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
२या कीटकनाशकासोबत कार्बेनडॅझिम १२ टक्के अधिक मॅन्कोझेब ६३ टक्के हे संयुक्त बुरशीनाशक १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
३ज्या आंबा बागांमध्ये मोहर फुललेल्या अवस्थेमध्ये आहे, अशा ठिकाणी फळधारणेचे प्रमाण वाढविण्यासाठी २० पीपीएम एनएए (२० मिली ग्रॅम प्रति लिटर) फवारणी करावी.
४भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आल्यास हेक्झॅकोनेझोल ५ टक्के प्रवाही ५ मिली किंवा गंधक ८० टक्के पाण्यात विरघळणारी पावडर २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
५पाऊ स पडल्यामुळे जमिनीत कोषावस्थेत असलेली फळमाशी बाहेर येऊ न फळे काढणीस तयार असणाºया बागांमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यासाठी फळमाशीच्या नियंत्रणासाठी आंबा बागेत रक्षक सापळे हेक्टरी ४ या प्रमाणात वापरावे.