साइडपट्टी खोदल्याने अपघातांचा धोका, बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 03:37 AM2018-03-25T03:37:16+5:302018-03-25T03:37:16+5:30
कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील कर्जत ते डोणे भागात रस्त्याच्या कडेला रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड कंपनीने केबल टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, परंतु खोदकाम करताना साइडपट्टी खचली आहे.
नेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील कर्जत ते डोणे भागात रस्त्याच्या कडेला रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड कंपनीने केबल टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, परंतु खोदकाम करताना साइडपट्टी खचली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित रस्त्याचे काम थांबवून ठेकेदाराकडून नियमाप्रमाणे काम करून घ्यावे, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात ेयेत आहे.
कर्जत-कल्याण राज्यमार्ग नादुरुस्त असल्याने प्रवासी तसेच स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यानंतर वेगवेगळ्या निधीतून रस्त्याचे काम झाले आहे. असे असताना रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि. कंपनीच्या ठेकेदाराने साइडपट्टी खोदून केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे रस्ता नादुरुस्त झाला असून अपघाताची शक्यता वाढली आहे.
कंपनीच्या ठेकेदाराने नियमाप्रमाणे काम करावे, एखादी दुर्घटना झाल्यास त्यास सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंपनी जबाबदार राहील, असा इशारा कर्जत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक काँग्रेस अध्यक्ष सागर शेळके यांनी दिला आहे.
कर्जत-मुरबाड रस्त्यावर साइडपट्टी खोदून केबल टाकण्यात आली आहे. त्यानंतर माती टाकून लेव्हलिंग, रोलिंग केली नसल्याने पावसाळ्यात याठिकाणी पाणी साचून साइडपट्टी कमकुवत होऊन त्यात अनेक गाड्या फसण्याची शक्यता आहे. यामुळे रस्त्याचे काम दर्जेदार करावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याचे सूचना फलकही परिसरात लावण्यात आलेले नाही. शिवाय कामामुळे खोदलेली माती रस्त्यावर येत असल्याने चालकांना वाहन चालविताना अडचणी येत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याची कामे करावीत, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
केबल टाकताना नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे या रस्त्यावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर कंपनीकडून नियमाप्रमाणे बांधकाम करून घ्यावे. रस्ता सोडून अंतरावर केबल टाकावी, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस स्थानिक नागरिक व प्रवाशांच्या हितासाठी रस्त्यावर उतरेल.
- सागर शेळके,
अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस