रोहा : काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रोहा तालुक्यात पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे भात लावणीची खोळंबलेली कामे पुन्हा सुरू झाली आहेत. दमदार पाऊस बरसू लागल्याने भात लावणीच्या कामाने चांगलाच वेग घेतला आहे. पावसामुळे नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहू लागले असून शेतात लावणीसाठी आवश्यक मुबलक पाणी साठू लागले आहे. त्यामुळे यंदा उत्पन्न येण्याची अपेक्षा बळीराजाला आहे.
पावसाळी हंगामात भात लावणीसाठी मुबलक पाणी मिळाले तर भाताचे पीक चांगले येते. यंदा पावसाचे प्रमाण व एकंदरच परिस्थिती अनुकूल असल्याने चांगले पीक येण्याची शक्यता शेतकरीवर्गातून होत आहे. यंदा मे महिन्यात लग्नाचे मुहूर्त कमी होते, त्यामुळे शेतीच्या मशागतीची व पावसाळी भात लागवड करायची राबांची तयारी यासाठी शेतकरीवर्गाला पुरेसा अवधी मिळाला, तर रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावरच पेरणीची कामे पूर्ण करण्यात आली. जूनच्या पहिल्याच आठवड्यात मोसमी पावसाने सुरुवात केल्याने पेरलेले राब वर आल्याने आता भाताची रोपे लागवडी योग्य झाली आहेत, त्यामुळे सध्या तालुक्यात ठिकठिकाणी बळीराजा भात लागवडीच्या कामाला लागल्याचे चित्र आहे. भातशेती लागवड करीत असताना इतर घटकांचे भाव गगनाला भिडले असल्याने भातशेती पिकविणे परवडत नाही. अशा स्थितीत शेतकरीवर्ग इतर मजूर न घेता घरच्या घरी कामे करून जास्तीत जास्त आर्थिक बचत कशी होईल, हीच विचारसरणी अमलात आणून कामे करताना दिसत आहेत.
यंदा पाऊस चांगला झाला असल्याने भातशेती लागवडीसाठी एकंदरच परिस्थिती पूरक आहे. लावणीसाठी शेतात पाणीही आहे. त्यामुळे रोहा विभागातील शेतकरी लावणीत मग्न आहेत. यंदा चांगले पीक पदरात पडेल आणि त्यातून चांगले उत्पन्नही मिळेल, अशी आशा आहे.- नंदकुमार मरवडे, शेतकरी, चिल्हे रोहा