चिमणीचे अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड, पोलीस निरीक्षकाचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 01:29 AM2019-04-28T01:29:42+5:302019-04-28T01:30:18+5:30
विनोद भोईर पाली : बालवयात चिमणीचा चिवचिवाट ऐकणे किती तरी आनंददायी असते. हा घास चिऊचा, चिऊ ये, खाऊ घे ...
विनोद भोईर
पाली : बालवयात चिमणीचा चिवचिवाट ऐकणे किती तरी आनंददायी असते. हा घास चिऊचा, चिऊ ये, खाऊ घे किंवा चिमणी-चिमणी पिते पाणी, हे बोबडे बोल ऐकवतच बालपणी आई चिमुकल्यांना घास भरविते. मात्र, तीच चिमणी आता दिसणेही दुरापास्त झाले आहे. चिमण्यांविषयी असलेला जिव्हाळा वृद्धिंगत व्हावा आणि चिमण्यांचे अस्तित्व टिकून राहावे, या हेतूने सुधागड तालुक्यातील पाली शहर पोलीसठाण्याच्या आवारात त्यांच्या दाणा-पाण्याची सोय केली
आहे.
मुके जीव कडक उन्हाळ्यात पाण्याच्या थेंबासाठी तडफडत असतात. चिमण्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी शाळा- महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी आपल्या घराच्या अंगणात पक्ष्यांसाठी पाणी, धान्याची सोय करावी व त्यांची तृष्णा भागवून पुण्याचे काम करावे. - रवींद्र शिंदे, पोलीस निरीक्षक, पाली
झाडाला दोरी बांधून केली दाणा-पाण्याची सोय
मातीचे भांडे, प्लॅस्टिकचे डबे, कृत्रिमरीत्या तयार केलेले घरटे पोलीसठाण्याच्या आवारात असलेल्या झाडांना दोरीच्या साहाय्याने बांधले. त्या भांड्यात पाणी, धान्य टाकून चिमण्यांच्या दाणा-पाण्याची सोय केली. सोबतच जमिनीत खड्डा खोदून जलकुंड तयार केले आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांचेही लाभले सहकार्य
उन्हाळ्यात पक्ष्यांच्या दाणा-पाण्याचे नियोजन करण्याविषयी पाली पोलीसठाण्यातील महिला व पुरु ष कर्मचारीही रोज नियमितपणे पाणी व अन्नधान्याची सोय पोलीसठाण्याच्या आवारात करीत आहेत.