- मधुकर ठाकूरउरण: उरण तालुक्यातील करंजा -नवापाडा येथील निधी अभावी अपुर्ण अवस्थेत असलेल्या ड्रायडॉक व संरक्षक भिंतीची लांबी वाढविण्याच्या कामासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तांकडे ५२ कोटी १० लाख ६७ हजार ९२० रुपये निधीची मागणी केली आहे.मागील ९ वर्षांपासून रखडलेल्या डॉयडॉकच्या या कामामुळे नौका दुरुस्तीच्या कामासाठीहजारो स्थानिक मच्छीमारांची मोठी गैरसोय होत आहे.यामुळे मच्छीमारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुमारे दहा वर्षापूर्वी एक हजार बोटी क्षमतेच्या मच्छीमार बोटीं लॅण्डींग करण्यासाठी दिडशे कोटी खर्चाचे अद्यावत करंजा मच्छीमार बंदराची उभारण्यात येत आहे.या मच्छीमार बंदराची उभारणी करंजा-नवापाडा येथील मच्छीमार बोटी दुरुस्तीसाठी पुर्वापार वापर करत असलेल्या जागेवर करण्यात आली आहे.त्यामुळे करंजा-नवापाडा येथील मच्छीमार बोटी दुरुस्तीसाठी जागा उरली नव्हती. त्यामुळे करंजा-नवापाडा येथील मच्छीमार बोटी दुरुस्तीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर मत्स्यव्यवसाय विभागाकडून करंजा-नवापाडा येथील मच्छीमारांसाठी बोटी दुरुस्तीसाठी १५० कोटी खर्चाच्या उभारण्यात येत असलेल्या करंजा मच्छीमार बंदराच्या बाजुलाच २५० मीटर लांबीचा व २०० मीटर रुंदी अशी ५०००० चौमी जागा ड्रायडॉकसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मच्छीमार बोटींची दुरुस्ती, रंगरंगोटी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या जागेसभोवार संरक्षक भिंत उभारणी आणि जागेचे सपाटीकरण , कॉक्रीटीकरण करण्याच्या कामांसाठी ९ वर्षांपूर्वी मत्स्यव्यवसाय विभागाकडून सुमारे साडेनऊ कोटी निधीही मंजुर केला आहे. मात्र मागील ९ वर्षांपासून सुरू असलेले ड्रायडॉकचे काम अद्यापही पुर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटींची डागडूजी, रंगरंगोटी, दुरुस्तीच्या कामांसाठी जागाचउपलब्ध नाही.
शिवाय ड्रायडॉकच्या जागेवर सपाटीकरण, कॉक्रिटीकरण, संरक्षण भिंत आदी अपुऱ्या कामांमुळे मच्छीमारांना बोटी दुरुस्तीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.याकडे मत्स्यव्यवसाय विभागाकडून दुर्लक्षच होत असल्याने मच्छीमारांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.यामुळे करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोळी, संचालक हेमंत गौरीकर आदींनी संस्थेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून ड्रायडॉकची अपुरी राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड व मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तांकडे केली होती.मच्छीमार संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागणीची दखल घेऊन महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डानेही मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तांकडे कामासाठी मंजुरी व निधीची मागणी केली आहे.
रखडलेल्या ड्रायडॉकचे अपुरे काम पूर्ण करण्याच्या कामासाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तांकडे ५२ कोटी १० लाख ६७ हजार ९२० रुपये निधीच्या खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.कामासाठी मंजुरी व निधी उपलब्ध होताच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.या कामामध्ये प्रामुख्याने १०० मीटर लांबीची ब्रेक वॉटर जेट्टी वाढविण्यात येणार आहे.ड्रायडॉकचे सपाटीकरण, कॉक्रिटीकरण, संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे.मंजुरी व निधी उपलब्ध होताच दोन वर्षांच्या मुदतीत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता तुषार पाटोळे यांनी दिली. ९ वर्षांपूर्वी मत्स्यव्यवसाय विभागाकडून या ड्रायडॉकच्या कामावर साडेनऊ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.त्यानंतरही ड्रायडॉकचे काम अपूर्णच राहिले आहे. मागील ९ वर्षांपासून अपुर्ण अवस्थेत असलेल्या ड्रायडॉकच्या कामामुळे मच्छीमार बोटींच्या दुरुस्ती, रंगरंगोटीच्या कामांसाठी हजारो मच्छीमारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे मागील नंऊ वर्षांऩंतरही रखडत रखडत चाललेले काम पुर्ण करण्यासाठी संस्थेकडून सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याची माहिती करंजा मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोळी यांनी दिली.