रोहा - एका आदिवासी महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याची घटना ताजी असताना शनिवारी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे एसटीत एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिला कोलाडजवळील आंबेवाडी प्राथिमक केंद्रात दाखल करीत तिथे तिची प्रसूती झाली. आईची तब्येत ठिक असली तरी बाळाचे वजन कमी असल्याने त्यांना अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पनवेल-महाड एसटीत शनिवार सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. ही वार्ता जिल्हाभर पसरल्यानंतर शासन व लोक प्रतिनिधींबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सुशीला रवी पवार ही गरोदर महिला पेण वडखळ येथून महाडकडे एसटीने (एम.एच.१४, बी.टी. २६३२) प्रवास करीत होती. ही बस सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोलाडनजीक पुई महिसदरा पुलावर आली असता, या पुलावर प्रचंड प्रमाणात पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमधून गचके खात जात होती. यामुळे सुशीला पवार यांना अचानक पोटात दुखू लागले. त्यांना कळा सुरू झाल्या. ही बाब लक्षात येताच सदरील एसटीचालक आणि वाहक यांनी प्रसंगावधान दाखवत एसटी बस ही आंबेवाडी येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात आणली. त्यांने तेथे दाखल करण्यात आले.
आंबेवाडी केंद्रातील डॉ. व्ही. बी. टिवडे व डॉ. एम. एस. वाघ यांनी तत्परतेने महिलेवर उपचार सुरू केले. त्यानंतर महिलेची सुखरूप प्रसूती झाली. सुशीला पवार या सुखरूप आहेत. बाळाचे वजन कमी असल्याने दक्षता म्हणून बाळ व आईला अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.