महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बेटावर वीजेचे संकट, तीनही गावातील पाणी पुरवठा ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 08:13 AM2023-06-21T08:13:37+5:302023-06-21T08:14:39+5:30

समुद्रातील केबल्स नादुरुस्त झाल्याने अडचण, जागतिक घारापुरी बेटाची वाटचाल पुन्हा अंधाराकडे!

Due to the unforgivable neglect of Mahavitran there is a power crisis on the island, water supply in all the three villages is stopped in Gharapuri | महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बेटावर वीजेचे संकट, तीनही गावातील पाणी पुरवठा ठप्प

महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बेटावर वीजेचे संकट, तीनही गावातील पाणी पुरवठा ठप्प

googlenewsNext

मधुकर ठाकूर, उरण: जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटाला वीज पुरवठा करणाऱ्या पाच पैकी समुद्रातील दोन विद्युत केबल नादुरुस्त झाल्या आहेत.परिणामी महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बेटावरील तीनही गावातील नागरिकांना होणारा पाणीपुरवठा तर बंद पडला आहेच.त्याशिवाय घरगुती वीजपुरवठाही  वारंवार खंडित होत असल्याने मात्र आता बेट पुन्हा अंधारात बुडत चाललेले आहे.

घारापुरी बेटावर स्वातंत्र्यानंतर तब्बल ७३ वर्षांनी रहिवाशांना कायमस्वरूपी वीज मिळाली आहे. स्वातंत्र्यानंतर मिळालेल्या वीजेचा सोहळा २०१८ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वाध्याय परिवाराचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बेटावर दिमाखात पार पडला.२० कोटी रुपये खर्चून समुद्रातून न्युट्लसह टाकण्यात आलेल्या उच्च दाबाच्या पाचही वीज वाहिन्यांचे काम तांत्रिकदृष्ट्या सदोषच झाले असल्याची तक्रार तीन वर्षांपूर्वीच  तत्कालीन सरपंच बळीराम ठाकूर यांनी केली होती.

उद्घाटनासाठी गावागावात घाईघाईत टाकलेल्या अंतर्गत केबल्स जमिनीवर टाकण्यात आल्याने वारंवार दोष निर्माण होत आहे.समुद्रातुन टाकण्यात आलेल्या मोराबंदर गावातील मुख्य केबल वाहिन्यांच्या डीपीमध्ये सुरुवातीपासूनच वारंवार बिघाड उद्भवत असल्याने बेटावरील वीज वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.या ठिकाणी होणाऱ्या वारंवार बिघाडावर कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास भविष्यात सबमरिन केबललाच फटका बसण्याची भीतीही तीन वर्षांपूर्वीच तक्रारीतुन व्यक्त केली होती.महावितरण विभागाचा एकही अधिकारी, कर्मचारी बेटावर राहात नाहीत.मोबाईलवरही नेहमीच नॉटरिचेबल असतात. यदाकदाचित मोबाईलवर संपर्क झालाच तर अधिकारी, कर्मचारी उध्दट, उर्मटपणे उत्तरे देऊन अपमानित करतात.बेटावरील वीजपुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी बेटावरच कायम उपलब्ध होण्यासाठी कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच बळीराम ठाकूर यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे तक्रारीव्दारे केली होती.मात्र ग्रामपंचायतीच्या मागणीकडे आणि होणाऱ्या नुकसानीकडे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे कार्यकारी अभियंत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे कार्यकारी अभियंत्यांनी जाणीवपूर्वक केलेल्या अक्षम्य दुर्लक्षपणाचे विपरीत परिणाम आता दिसू लागले आहेत.बेटाला वीजपुरवठा करणाऱ्या समुद्राखालील उच्च दाबाच्या पाच विद्युत वाहिन्यांपैकी एक केबल २१ मे २०२२ रोजी नादुरुस्त होऊन निकामी झाली आहे.न्युट्लसह उरलेल्या चारपैकी एक विद्युत केबल १५ जुन २०२३ रोजी निकामी, नादुरुस्त झाली आहे.त्यामुळे सध्या बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर,या तीनही गावांना न्युट्लसह दोन फेजवरुनच वीजपुरवठा केला जात आहे.बेटवासियांना पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत पंपांना थ्रीफेज वीजेचा तुटवडा भासत असल्याने ग्रामपंचायत करीत असलेल्या तीनही गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.अपुऱ्या , कमी दाबाच्या आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे रहिवाशांची विद्युत उपकरणे चालेनाशी झाली आहेत.जळून बिघडू लागली आहेत.यामुळे बेटवासिय त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या गळथान कारभारामुळे बेटवासियांची वाटचाल पुन्हा अंधाराकडे होत चालली असल्याने रहिवाशांमध्ये असंतोष पसरला आहे.

बेटवासियांवर येऊ घातलेले वीजेचे संकट दूर करण्याच्या मागणीसाठी सोमवारी (१९) घारापुरी सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकुर,सदस्या अरुणा घरत, नीता ठाकुर,हेमाली म्हात्रे यांनी महावितरण  विभागाचे कार्यकारी अभियंता  एस.ए. सरोदे, सहाय्यक कार्यकारी अभियंता बईकर, ज्युनिअर इंजिनिअर रणजित देशमुख यांची भेट घेतली. निवेदन देऊन चर्चाही केली असल्याची माहिती उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.

घारापुरी बेटावर वीज पुरवठा करणाऱ्या समुद्राखालील दोन फेज नादुरुस्त झाले आहेत.थ्री फेजच्या वीजेसाठी वेगळी मोटार बसविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. समुद्रातील नादुरुस्त केबल्स दुरुस्त करण्यासाठी खासगी एजन्सीकडे काम सोपविण्याच्यात येणार आहे.माळत्र यासाठी किती काळावधी लागेल निश्चितपणे सांगता येणार नाही. -एस.ए.सरोदे, मुख्य अभियंता

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: Due to the unforgivable neglect of Mahavitran there is a power crisis on the island, water supply in all the three villages is stopped in Gharapuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.