मधुकर ठाकूर
उरण: खोपटे-बांधपाडा ग्रामपंचायत व महसुली हद्दीतील खारभुमी संरक्षणासाठी असलेले बांधबंदिस्ती समुद्राच्या उधाणाच्या भरतीच्या पाण्यामुळे मागील काही वर्षांपासून वारंवार उध्वस्त होत आहेत.खारभुमींच्या भातशेतीत समुद्राचे पाणी शिरत असल्याने शेकडो एकर शेतजमिन नापीक झाली आहे.त्याकडे खारलॅण्ड विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नापीक जमिनीवर पीक घेणे शेतकऱ्यांना अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे खारलॅण्ड विभागाने वारंवार उध्वस्त होणाऱ्या संरक्षक बांधबंदिस्तीं कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
खोपटे- बांधपाडा खाडी किनाऱ्यावर वसलेले पाच हजार लोकसंख्येच्या गावाला काही वर्षांपासून समुद्राच्या उधाणाच्या भरतीच्या पाण्यामुळे वारंवार उध्वस्त होणाऱ्या संरक्षक बांधबंदिस्तींच्या समस्येने ग्रासले आहे.संरक्षक बांधबंदिस्तींच वारंवार उध्वस्त असल्याने समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणावर भात शेतात शिरते.एकदा की समुद्राचे खारे पाणी शेतजमीनीत शिरले की जमीन नापीक ठरते.पुढील किमान तीन वर्षांपर्यंत तरी या शेतजमीनीत कोणत्याही प्रकारचे पीक घेता येत नाही.दरवर्षी भात शेतीच्या संरक्षक बांधबंदिस्ती समुद्राच्या उधाणाच्या भरतीच्या पाण्यामुळे उध्वस्त होण्याच्या प्रकारामुळेशेकडो एकर जमीन नापीक झाली आहे.
या नापीक जमीनीवर पीकही घेता येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.आर्थिक संकटात सापडले आहेत.त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची येथील शेतकऱ्यांकडून वारंवार केली जात आहे. मात्र खारलॅण्ड विभागाकडून शेतकऱ्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
वारंवार बांधबंदिस्ती उध्वस्त करत शिरणाऱ्या समुद्राच्या उधाणाच्या भरतीच्या पाण्याला पायबंद घालण्यासाठी दोन दिवसांपूर्वी खारभूमीचे कनिष्ठ अभियंता संजय जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या विभागात पाहाणी केली. या पाहणीत ठिक- ठिकाणी बांधबंदिस्ती आणि उघाडी उध्वस्त झाले असल्याचे असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या ठिकाणी बांधबंदिस्ती,उघाड्या उध्वस्त झालेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन काम करण्यासाठी जाण्यासाठी मात्र मार्ग उपलब्ध नाहीत.त्यामुळे वाहन पोहचणे अवघड आहे.त्यासाठी आधी मार्ग तयार करावा लागेल त्यानंतरच उपाययोजना करणे शक्य होईल.यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता भासणार आहे. त्याआधी या कामाचे इस्टिमेंट तयार करण्याचे आश्वासन खारभूमीचे कनिष्ठ अभियंता संजय जाधव यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.
उरण परिसरातील ठिक- ठिकाणी विकासाच्या नावाखाली समुद्रात मोठ्या प्रमाणावर माती-दगडांचे भराव केले जात आहेत. खोपटा परिसरातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे कंपन्या, कंटेनर यार्ड उभारण्यात आले आहेत. येत आहेत. यासाठी होणाऱ्या भरावामुळे समुद्राची पातळी सातत्याने वाढत चालली आहे. त्यामुळेच मागील काही वर्षांपासून समुद्राच्या उधाणाच्या भरतीच्या पाण्यामुळे वारंवार बांधबंदिस्ती, उघाड्या उध्वस्त होत आहेत. उध्वस्त होणाऱ्या संरक्षक बांधबंदिस्तींमुळे मात्र परिसरातील शेकडो एकर जमीन नापीक झाली आहे. अधिकारी पाहणी करून फक्त आश्वासने देऊन शेतकऱ्यांच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक करीत आहेत. यासाठी खारभुमी विभागाचे होणारे दुर्लक्षच आणि अधिकारीच सर्वाधिक कारणीभूत असल्याचा आरोप येथील शेतकरी संजय ठाकूर यांनी केला आहे.